खासगीकरणाचा सपाटा लावणाऱ्या भाजपाने एस.टी.महामंडळाच्या सरकारीकरणासाठी पाठिंबा देणे दुटप्पीपणाचे : ना.विजय वडेट्टीवार
सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर |
भाजपने देशातील काँग्रेसने उभारलेल्या अनेक प्रकल्पांचे खासगीकरण करण्याचा सपाटा सुरू केलेला असताना एस.टी.महामंडळाच्या सरकारीकरणासाठीच्या आंदोलनाला पाठिंबा देणे हे दुटप्पीपणाचे वागणे असल्याची जळजळीत टीका राज्याचे पुनर्वसनमंत्री तथा काँग्रेस पक्षाचे रायगड संपर्कमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी केली. छत्रपतींचा,नरवीरांचा अन् महामानवांचा रायगड जिल्हा काँग्रेसमय करणार असल्याचा निर्धारही यावेळी ना.वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.
कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृहामध्ये काँग्रेस पक्षाच्या जाहिर मेळावा आणि आढावा बैठकीप्रसंगी ना.वडेट्टीवार यांच्यासमवेत रायगड प्रभारी चारूलता टोकस, श्रीरंग बरगे, रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत, प्रदेश सरचिटणीस नंदा म्हात्रे, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील रायगड जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा श्रध्दा ठाकूर,महाड विधानसभा काँग्रेस नेते हनुमंत मो.जगताप, महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा महाड नगराध्यक्षा स्नेहल जगताप-कामत तसेच महाराष्ट्र विद्यार्थी काँग्रेस सरचिटणीस श्रीयश जगताप, रायगड जिल्हा सरचिटणीस धनंजय देशमुख, जिल्हा खजिनदार दिलीप भागवत, शहरअध्यक्ष अमोल भुवड, उपसभापती शैलेश सलागरे, जिल्हा महिला काँग्रेस सरचिटणीस शुभांगी चव्हाण, पोलादपूर तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा सुवर्णा भुवड, युवक तालुका अध्यक्ष प्रवीण महाडीक, शहर अध्यक्ष सचिन दुदुस्कर, विभागीय अध्यक्ष उस्मान करबेलकर तसेच खरेदी विक्री संघ अध्यक्ष अनंत देशमुख, श्रीधर सकपाळ, अनिल येरूणकर, महाड तालुका अध्यक्ष राजू कोरपे आदी व्यासपिठावर उपस्थित होते.
आपल्या घणाघाती भाषणामध्ये ना.विजय वडेट्टीवार यांनी, सत्तर वर्षांत काँग्रेसने काय केले असे विचारणारे आता महागाई, धार्मिक तेढ, नफेखोरी आणि बेरोजगारीने त्रस्त झाले आहेत. हीच योग्य वेळ आहे काँग्रेसने काय केले सांगण्याची आणि केंद्रातील सरकार काय करीत आहे हे समजवून सांगण्याची. मोजक्याच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून रोज एक तास घराघरात जाऊन संपर्क साधला तर संपूर्ण मतदार संघातील तब्बल 20 पोलींग बूथपर्यंत अल्पावधीमध्येच काँग्रेसचे विचार पोहोचविता येतात. आता मोबाईलवरील सोशल मिडीयावरून मोदींची स्तुती करणाऱ्यांवर शिव्याशाप पडू लागले आहेत. कंगना राणावतसारख्या महिलेने स्वातंत्र्य भीकेमध्ये मिळालेले म्हणणे हा शहिदांचा अपमान आहे, प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये कंगना राणावतविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची गरज आहे, अशी खरमरीत टीका करून काँग्रेसच्या ब्रिटीशांविरूध्दच्या लढाईच्या परंपरेत हौतात्म्य आहे आणि हे ज्यांचे फोटो लावतात ते माफी मागत होते, असेही ना. वडेट्टीवार यांनी सांगितले. काँग्रेस कार्यकर्ता अन्य पक्षांच्या चटईवर बसणार नाही म्हणून तो एकला चलो रे चा नारा देऊन स्वतंत्रपण जोपासेल, असे मत यावेळी ना.वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.
नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांच्या भाषणातून संपर्कमंत्री म्हणून महाड व पोलादपूर तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण कार्यकर्त्यांना आगामी निवडणुक काळामध्ये काँग्रेसपक्षाची ताकद देण्याचे आवाहन ना.विजय वडेट्टीवार यांना करण्यात आले. याप्रसंगी रायगड प्रभारी चारूलता टोकस यांनी, बॅरिस्टर अंतुले, मधुकर ठाकूर आणि माणिकराव जगताप या स्वर्गीय नेत्यांच्या रायगड जिल्हयातील कार्यकर्त्यांना येत्या निवडणुकीमध्ये मोठया प्रमाणात ताकद देण्याचे काम करणार असल्याचे सांगून रायगड जिल्ह्यामध्येच नव्हे तर संपूर्ण राज्यामध्ये काँग्रेस एकला चलो रे अशी भूमिका घेणार असल्याचे सांगितले. यावेळी रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत यांनी, रायगड जिल्हयातील काँग्रेस नेतृत्वामध्ये एकदिलाने काम करण्याची वृत्ती असताना अलिबाग पेणपासून महाड-पोलादपूरपर्यंत काँग्रेस पक्षसंघटना वाढविणार असल्याचे सांगितले.
प्रारंभी पोलादपूर तालुका काँग्रेस अजय सलागरे यांनी प्रास्ताविकामध्ये काँग्रेसपक्षाचे मतदार आणि कार्यकर्ते अद्याप ठाम असल्याचे सांगून आगामी नगरपंचायत तसेच पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी एकला चलो रे अशी भूमिका घेऊन जाणार असल्याचे सांगितले.
यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते मोहन शिंदे, माजी नगरसेविका शुभांगी चव्हाण, उपसभापती शैलेश सलागरे यांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश शिंदे यांनी केले.
यानंतर ना.विजय वडेट्टीवार यांनी पोलादपूर तालुक्यातील केवनाळे आणि साखर सुतारवाडीतील पुनर्वसनाचा आढावा घेतला. या बैठकीला प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, तहसिलदार दिप्ती देसाई, विविध विभागाचे अभियंते, अधिकारी उपस्थित होते.








Be First to Comment