४१ व्या सभेत उपटला शौचालयाचा जुना वाद ; आता तोडगा आयुक्त काढणार
सिटी बेल | पनवेल |
कोव्हिड विशाणूच्या पार्श्वभूमीवर लादल्या गेलेल्या निर्बंधांच्या कारणाने पनवेल महानगरपालिकेच्या सभा आज पर्यंत ऑनलाईन होत होत्या.कोरोना चे रुग्ण एकेरी संख्येत सापडत असल्याने निर्बंध देखील शिथिल होत आहेत.त्यामुळेच पनवेल महानगरपालिकेची 41 वी सभा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आली.बऱ्याच दिवसांनी ऑफलाईन सभा होत असल्याने सदस्यांच्यात उत्साह दिसून येत् होता.विषय पत्रिकेतील आठही विषयांना मंजुरी या सभेत देण्यात आली.
उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी दिला पदाचा राजीनामा
सभेच्या सुरुवातीलाच उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी राजीनामा सादर केला. महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे ८ विद्यमान सदस्यांचे पद संपुष्टात आल्याने त्या ८ सदस्यांच्या जागी नविन सदस्यांची नेमणूक करण्यात आली.पनवेल महानगरपालिका महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांची व सभापतीची एक वर्षाची मुदत दिनांक १५-८-२०२१ रोजी संपुष्टात आल्याने, त्यांच्या जागी नविन सदस्यांची देखील नेमणूक करण्यात आली.
पनवेल महानगरपालिका हद्दीतील दिव्यांग व्यक्ती, महिला ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी यांना नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाअंतर्गत बस भाड्यात सवलतीपोटी येणाऱ्या रक्कमेची प्रतिपूर्ती नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमास अदा करण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली.पनवेल महानगरपालिकेतील चतुर्थश्रेणी कर्मचारी व वाहनचालक यांना धुलाई भत्त्यामध्ये वाढ करून देण्याच्या प्रास्तवास मंजुरी मिळाली,त्यानुसार धुलाई भत्ता रु.100 वरून रु.150 होणार आहे.
शिक्षणावरील खर्चासाठी शासनाकडुन प्राथमिक शिक्षणाच्या वेतनाचा ५०% अनुदान प्राप्त होणार आहे. तरी यापुढे माहे ऑक्टोबर २०२१ पासून ५०% अनुदान महानगरपालिकेने शिक्षणाच्या वेतनाचा मान्यबाबींवर खर्च करण्याच्या निर्णयास मंजुरी देण्यात आली.पनवेल महानगरपालिका मालकीचे कार्यालये, शाळा, फिश मार्केट, भाजी मार्केट, उद्याने शॉपिंग कॉम्पलेक्स, नाट्यगृह, आंबेडकर भवन, प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णालये व शौचालये इत्यादी ठिकाणच्या विद्युत व्यवस्थेची दोन वर्षाकरीता निगा, देखभाल, दुरुस्ती सुधारणा व नुतनीकरण करण्याच्या कामास मंजुरी देण्यात आली.पनवेल महानगरपालिका मालकीच्या पथदिव्यांची दोन वर्षाकरीता निगा, दुरुस्ती, परिचलन, सुधारणा व नुतनीकरण करणेकामी प्रशासकीय मंजुरी देण्यात आली,त्यानुसार 10 इलेक्ट्रिशियन आणी 5 हेल्पर ची नियुक्ती करण्यात येईल.
पनवेल महानगरपालिका हद्दीतील नविन पनवेल (पूर्व) येथील प्लॉट क्र. १२९ से.क्र.८ या गार्डन भूखंडात रामकी कंपनीच्या CSR फंडातून विरंगुळा केंद्राची उभारणी करणेस मान्यता देण्यात आली.
नगरसेवक सतीश पाटील यांची पर्यावरणप्रेमी लक्षवेधी सूचना
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पनवेल महानगर जिल्हा अध्यक्ष नगरसेवक सतीश पाटील यांनी पर्यावरण पूरक लक्षवेधी सूचना मांडली.पनवेल महानगरपालिका हद्दीत मोठाल्या जाहिरातींच्या पालकांसमोर येणाऱ्या झाडांची कत्तल केली जात असल्याचे पुरावे सादर करून त्यांनी या सर्वसाधारण सभेत अशाप्रकारे जर वृक्ष हानी कुठला कंत्राटदार करत असेल तर त्याचा ठेका रद्द करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी असा ठराव मांडला.पीठासीन अधिकार्यांनी ठरावाचे स्वागत करून त्याबाबत सकारात्मक भूमिका घेणार असल्याचे कळविले.
छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शौचालयाचा वाद आता आयुक्तांच्या कोर्टात !
छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सार्वजनिक शौचालयाचा वाद पुन्हा एकदा सर्वसाधारण सभेत उफाळून आला.सत्ताधार्यांनी शौचालय तोडण्यासाठी तर विरोधी पक्षांनी शौचालय न तोडण्यासाठी आग्रह धरलेला आहे.सभागृहनेते परेश ठाकूर यांनी महापालिकेच्या ऑडिट चा दाखला देत ते धोकादायक असल्याने पाडले गेले पाहिजे अशी भूमिका मांडली.तर विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी जुने शौचालय पाडले तर त्या ठिकाणी आपण दोघे मिळून नवीन बांधून देऊ,परंतु त्या ठिकाणी सार्वजनिक शौचालय असलेच पाहिजे अशी आग्रही भूमिका मांडली.यावर अनेकदा संधी देऊन देखील सुवर्णमध्य निघत नसल्याने आयुक्त देशमुख यांनी या वादाबाबत चा निर्णय स्वतः कडे राखून ठेवला आहे.








Be First to Comment