‘लालच’ आपले आर्थिक नुकसान करू शकते प्रलोभनांना बळी पडू नका
— विक्रम वैद्य
सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
‘हल्ली आपल्या बँक खात्यातील पैसे परस्पर काढून घेण्याचे प्रकार वाढले आहेत. त्याला आपणच जबाबदार आहोत. ‘तुम्हाला लॉटरी लागली, तुमचे कर्ज मंजूर झाले.’ असे एसएमएस आपल्या मोबाईलवर आले की, आपण लालचे पोटी लगेचच आपला ओटीपी सांगून टाकतो आणि मग आपल्या खात्यातील पैसे काढले जातात. पूर्वी दरोडेखोर रात्री अपरात्री येऊन हत्यारांचा धाक दाखवून दरोडे टाकायचे आता चोरीची पद्धत बदलली असून आपल्या जीवनावश्यक झालेल्या मोबाईलमुळे आपण फसू शकतो. म्हणून प्रलोभनांना बळी पडू नका. आपल्या येथील बंद पडलेल्या बँकेत असलेले पैसे मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यासाठी थोडा अवधी लागेल’ असा विश्वास सनदी लेखापाल व अर्थ तज्ञ विक्रम वैद्य यांनी येथे व्यक्त केला.
बँक ऑफ महाराष्ट्र कर्जत शाखेने ग्राहक मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी व्यासपीठावर महिला पोलीस हवालदार सानप, पत्रकार विजय मांडे, महिला मंडळाच्या मीना प्रभावळकर, कर्जत शाखेच्या व्यवस्थापक ललिता कांबळे, कशेळे शाखेचे व्यवस्थापक जगदीश पोर्णिकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. ललिता कांबळे यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविकात ग्राहक मेळाव्याचा उद्देश सांगितला. सानप यांनी, ‘उगाचच आलेले फोन घेऊ नका. सायबर गुन्हे वाढले आहेत. कोणतीही बँक आपल्याला फोन करून माहिती विचारत नाही. बँके विषयी कोणतेही काम असल्यास बँकेत येऊनच त्याची माहिती घ्यावी.’ असे सूचित केले.
पोर्णिकर यांनी, ‘पूर्वी बँक कर्ज घेण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना सर्रास नाही असे सांगत असे मात्र आता जास्तीत जास्त कर्ज वाटप करण्यासाठी पुढाकार घेते मात्र त्यासाठी बँकेशीच संपर्क करावा लागतो.’ असे सांगितले. विजय मांडे यांनी, ‘आपल्याला कर्ज पाहिजे असते त्यासाठी कागदपत्रांची आवश्यकता असते. कुणीही कारण नसताना फोन करून तुमचे कर्ज मंजूर झाले आहे. तुमची माहिती द्या. असे सांगून ही एक चोरी करण्याची नवीन शक्कल चोरट्यांनी आणली आहे. त्यासाठी घरी बसूनच आपल्या बँक खात्यात मोठी रक्कम एक दोन सेकंदात गायब होऊ शकते. एखादी बँक जास्त व्याज देते म्हणून आपण आपली आयुष्यभराची पुंजी तेथे ठेवतो आणि बँक काही कारणाने बंद झाल्यास आपल्याला डोक्याला हात लावण्याची वेळ येते. त्यामुळे सावध राहिले पाहिजे.’ असे सांगितले.
मिलिंद लेले या ग्राहकांनी आपला अनुभव कथन केला. सुनील म्हसे यांनी बँकेच्या विविध योजनांची माहिती दिली. याप्रसंगी जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षक समीर येरूणकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अंकुश भालीवडे, उमेश परदेशी, स्नेहा गाडे, श्रद्धा मुंढेकर आदींसह ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








Be First to Comment