Press "Enter" to skip to content

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

शुद्ध व नियमित पाण्याच्या मागणीसाठी लाडीवली ग्रामस्थ पुन्हा आक्रमक, रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार बेमुदत उपोषण

रा.जि.प. पाणी पुरवठा विभाग आणि ग्रुप ग्रामपंचायत गुळसुंदे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या  निर्णयांनाही दाखविली केराची टोपली

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

रसायनी येथील ग्रामपंचायत गुळसुंदे हद्दीतील लाडीवली गावांसह स्टेशनवाडी, डोंगरीची वाडी, फलाट वाडी चिंचेची वाडी या आदिवासी वाड्यांना रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत चावणे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेद्वारे बावन्न वर्षे जुन्या व जीर्ण झालेल्या  प्रकल्पातून कोणतीही जलशुद्धीकरण प्रक्रिया न करता मागील अठरा वर्षापासून पाताळगंगा नदीचे दूषित पाणी पुरवठा करून नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार थांबवून संबंधित गावांना शेजारीच असलेल्या एम. आय.डी.सी.कडून शुद्ध व नियमित पाणीपुरवठा व्हावा यासाठी येथील ग्रामस्थांनी वारंवार विनंत्या ,निवेदने, मोर्चे, आंदोलने करून देखील रायगड जिल्हा परिषदेचे ग्रामीण पाणी पुरवठा विभाग आणि ग्रुप ग्राम पंचायत गुळसुंदे  याकडे दुर्लक्ष करीत असल्याने मागील महिन्याच्या पंचवीस  ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा राष्ट्र सेवा दल संघटनेच्या वतीने रायगड जिल्हा परिषदेच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता.

सदर मोर्चानंतर मोर्चेक-यांचे शिष्टमंडळ, जिल्हा ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस. डी. येझरे उप अभियंता वेंगुरलेकर, सुनील मेटकरी यांच्यासोबत रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.

संबंधित पत्र

या बैठकीत १) गुळसुंदे व लाडीवली (आकुलवाडी) गावांकडे जाणाऱ्या जलवाहिनीवर जल मापक मिटर बसवणे २) चावणे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेवर तात्काळ दोन मजूरांची नेमणूक करणे ३) जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी सोडण्याबाबतचे वेळापत्रक संबंधित गावांना देणे ४) चावणे जलशुद्धीकरण केंद्र येथील TCL व आलम रजिस्टर नियमित ठेवणे व पाणी प्रक्रिया करणे ५) गुळसुंदे व लाडीवली (आकुलवाडी) गावांकडे जाणाऱ्या पाईप लाईनवर व्हॉल्व बसविणे, चेंबर व लॉकिंग व्यवस्था करणे ६) बीपीसीएल डिंपल ड्रम्स आणि लोना इंडस्त्रीज कंपन्यांना सी एस आर निधीमधून सॅन्ड फिल्टर बसविण्यासाठी पत्र देणे ७) तीन वर्षांपासून रखडलेल्या आमदार निधीमधून जलशुद्धीकरण केंद्र ते लाडीवली गावापर्यंतच्या पाईप लाईनचे काम तात्काळ पूर्ण करून प्रकल्प कार्यान्वित करावे ८) ज्या गावांमध्ये पाईपलाईन नाही अशा गाव आणि वाड्यांमध्ये जल जीवन मिशन मधून वैयक्तिक नळ जोडणी करून द्यावी ९) तु राडे वावेघर व गुळसुंदे ग्रामपंचायतींकडे एमआयडीसीचे थकीत पाणीपट्टी भरण्यासंबंधीचे पत्र देणे १०) गुळसुंदे ग्रामपंचायतीला एम.आय. डी. सी.कडून (नवीन नळ जोडणी) टॅपिंग देण्यासंबंधीचे पत्र देणे असे दहा निर्णय घेण्यात आले होते.

परंतु पाणी पुरवठा विभाग आणि ग्रुप ग्रामपंचायत गुळसुंदे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या आदेशांनाही केराची टोपली दाखवून वरील निर्णयांबाबत कोणतीही कारवाई केलेली नसल्याने अखेर ग्रामस्थानीं पंचवीस ऑक्टोबर रोजी रायगड जिल्हा परिषद प्रशासनाला दिलेल्या इशाऱ्यानुसार राष्ट्र सेवा दल संघटनेचे कार्यकर्ते आणि  लाडीवली ग्रामस्थ उद्या बुधवार दि.१७/११ /२०२१ पासून रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणास बसणार असल्याची माहिती राष्ट्र सेवा दलाचे रायगड जिल्हा संघटक सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, लाडीवली गावचे माजी पोलीस पाटील मारुती पाटील, ग्रामस्थ प्रतिनिधी जयवंत पाटील, विजया मांडवकर, ज्योती पाटील, सुरेखा वाघे, दर्शना म्हामणकर, राजश्री म्हामणकर, रेखा कालेकर राजश्री भोसले यांनी दिली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.