यादव गवळी समाजाच्या खंडाळे येथील सभागृहासाठी १५ लाखांचा निधी
खा. सुनील तटकरेंच्या हस्ते दिले मंजुरीचे पत्र
सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |
रायगड, ठाणे, मुंबई व सोलापूर या चार जिल्ह्यांची एकत्रित संस्था असलेल्या यादव गवळी समाज संघटनेच्या अलिबाग तालुक्यातील खंडाळे येथील इमारतीच्या वस्तीगृहासाठी व सभागृहासाठी रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी आपल्या खासदार निधीतून १५ लाख रूपयांचा निधी दिला आहे. या निधीच्या मंजुरीचे पत्र खा. सुनील तटकरे यांच्या हस्ते नागोठण्याजवळील आंबेघर येथे संपन्न झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागीय मेळाव्यात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी आ. अनिकेतभाई तटकरे, राष्ट्रवादीचे विभागीय नेते भाई टके, शिवरामभाऊ शिंदे, सदानंद गायकर आदी उपस्थित होते.
यादव गवळी समाजाचे रायगड जिल्हा अध्यक्ष राजेश मेहतर, उपाध्यक्ष विलास वालेकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुनील डबरे, राजेंद्र वरणकर, विष्णू महागावकर, शिक्षण समिती अध्यक्ष विलास चौलकर व समाज बांधव यावेळी उपस्थित होते. यादव गवळी समाजाच्या खंडाळे येथे होत असलेल्या या इमारतीसाठी यापूर्वीही तीन वर्षांपूर्वी खा. सुनील तटकरे यांनी त्यावेळी आपल्या आमदार निधीतून १५ लाख रूपयांचा निधी दिला होता. त्यावेळी विद्यमान खा. सुनील तटकरे व आ. जयंतभाई पाटील यांच्या हस्ते यादव गवळी समाजाच्या या इमारतीच्या कामाचे भुमीपुजन संपन्न झाले होते अशी माहितीही शिक्षण समिती अध्यक्ष व नागोठण्याचे माजी सरपंच विलास चौलकर यांनी पत्रकारांना दिली.








Be First to Comment