पोलादपूर नगरपंचायतीच्या नामाप्र व महिला आरक्षणाची आज सोडत ; 24 जानेवारीपासून प्रशासक कारभारानंतर आता निवडणुकीची प्रतिक्षा
सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर |
पोलादपूर नगरपंचायतीच्या दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी तब्बल दुसऱ्यांदा आरक्षण सोडत आयोजित करण्यात आली असून आज सोमवारी या सोडतीचे आयोजन महाड प्रांताधिकारी तथा प्रशासक प्रतिमा पुदलवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत स्व.बाळासाहेब ठाकरे सभागृहामध्ये करण्यात आले आहे.
राज्य निवडणुक आयोगाने राज्यातील एकूण 86 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग, नामाप्र महिला तसेच महिला आरक्षण सोडतीचा कार्यक्रम घेण्यासंदर्भात सूचना केल्यानुसार सोमवारी पोलादपूर नगरपंचायतीच्या दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आरक्षण निश्चितीचा कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे.
यापुर्वीच्या आरक्षण सोडतीमध्ये पोलादपूर नगरपंचायतीच्या दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी महिलांसाठी 50 टक्के आरक्षणानुसार प्रभागनिहाय आरक्षण जाहिर झाले आहे. याखेरिज, पाच सर्वसाधारण आणि तीन मागास व अनुसुचित जाती या उर्वरित आठ जागांवरही महिलांना पुरूष उमेदवारांविरूध्द उमेदवारी करण्याची संधी शक्य असल्याने आगामी पंचवार्षिक निवडणुकीमध्ये महिलाराज दिसून येणार होते.
दरम्यान,गेल्यावेळी लगतची राष्ट्रीय जनगणना 2011 मध्ये झाल्याने लोकसंख्येची नवीन आकडेवारी प्राप्त न झाल्याने प्रभागांची भूरचना ही 2016 प्रमाणेच कायम राहणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून प्राप्त झाले आहेत.यामुळे या सभेमध्ये अनुसुचित जाती महिला, अनुसुचित जमाती महिला, नागरिकांचा मागास्र्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले असून ते 50 टक्के म्हणजेच 9 प्रभागांसाठी निश्चित करण्यात आले आहे. मात्र, आजच्या आरक्षण बैठकीवेळी नामाप्र आरक्षण, नामाप्र महिला आरक्षण व सर्वसाधारण महिला आरक्षणाचा विचार केला जाणार आहे.
यामध्ये प्रभाग क्रमांक 1 मध्ये सर्वसाधारण महिला, प्रभाग 2 मध्ये अनारक्षित सर्वसाधारण (महिला किंवा पुरूष), प्रभाग क्रमांक 3 मध्ये अनुसुचित जाती सर्वसाधारण (महिला किंवा पुरूष), प्रभाग क्रमांक 4 मध्ये मागास प्रवर्ग महिला, प्रभाग क्रमांक 5 मध्ये अनारक्षित सर्वसाधारण (महिला किंवा पुरूष), प्रभाग क्रमांक 6 मध्ये मागास प्रवर्ग सर्वसाधारण (महिला किंवा पुरूष), प्रभाग क्रमांक 7 मध्ये मागास प्रवर्ग महिला, प्रभाग क्रमांक 8 मध्ये मागास प्रवर्ग सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 9 मध्ये सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 10 मध्ये सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 11 मध्ये सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 12 मध्ये मागास प्रवर्ग महिला, प्रभाग क्रमांक 13 मध्ये अनारक्षित सर्वसाधारण (महिला किंवा पुरूष), प्रभाग क्रमांक 14 मध्ये सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 15 मध्ये सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 16 मध्ये अनारक्षित सर्वसाधारण (महिला किंवा पुरूष), प्रभाग क्रमांक 17 मध्ये अनारक्षित सर्वसाधारण (महिला किंवा पुरूष) असे आरक्षण निश्चित झाले होते.
आता नव्याने आरक्षण सोडतीनुसार जाहिर झाल्यानंतर दि.15 ते 18 नोव्हेंबर 2021 पर्यंत मुख्याधिकारी पोलादपूर नगरपंचायत यांच्याकडे हरकती व सुचना देण्याची मुदत असून यानंतर दि.19 नोव्हेंबर 2021 रोजी जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे प्राप्त हरकती व सुचनांवर सुनावणी देण्यात येणार आहे.







Be First to Comment