Press "Enter" to skip to content

जनजागृती अभियानाची सांगता

वकील – न्यायाधीश म्हणतात “शहाणे असालं तर चढा कोर्टाची पायरी”

पॅन् इंडिया लीगल अवेअरनेस उपक्रमाची सांगता : पनवेल तालुका विधी सेवा समिती चा स्तुत्य उपक्रम

सिटी बेल | पनवेल |

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून देशभरातील शोषित,वंचित, दलित, दुर्लक्षित घटकांना न्याय मिळावा या हेतूने गांधी जयंती ते पंडित नेहरू जयंती या दरम्यान “न्याय सर्वांसाठी” या अभिनव उपक्रमाचा प्रसार केला जातो.पनवेल तालुका विधी सेवा समिती आणि पनवेल बार असोसिएशन यांच्या माध्यमातून गेले सहा आठवडे हे अभियान पनवेल तालुक्यात राबविले जात होते.रविवार दिनांक १४ नोव्हेंबर रोजी या अभियानाची सांगता करण्यात आली. याप्रसंगी अभियानामध्ये उत्कृष्ट योगदान देणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.जिल्हा न्यायाधीश माधुरी आनंद या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या.
     

२ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या दरम्यान पनवेल तालुक्यातील दुर्गम आदिवासी वाड्या, आडवाटेवरची गावे, ठाकूर वाड्या, कातकरी वस्त्या अशा दुर्लक्षित ठिकाणी पनवेल तालुका विधी सेवा समिती चे सदस्य पोहोचत होते.त्या ठिकाणी पथनाट्य, संवाद, लोकगीते, नाटिका,चित्रकला स्पर्धा,ज्येष्ठ नागरिक मार्गदर्शन शिबीर यांच्या माध्यमातून अन्याय सहन करू नका, कायदा तुमच्या पाठीशी आहे, न्याय प्राप्त करणे हा तुमचा अधिकार आहे, असे संदेश दिले गेले.माहितीपत्रके,कायद्याची ओळख पत्रिका यांचे वाटप करण्यात आले ज्यामुळे भविष्यात कुणाला न्याय मिळविण्याची गरज लागल्यास त्याला त्याचा लाभ होईल.       

जिल्हा न्यायाधीश,वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय आर एस भाकरे यांनी प्रस्ताविक सादर केले त्यात त्यांनी अभियानामागची भूमिका विषद केली.या अभियानाची आज सांगता होत असली तरी देखील या अभियानातून ज्यांना न्याय मिळवून देण्याची गरज आहे,ती प्रक्रिया खऱ्या अर्थाने आजपासून  सुरू झाली आहे असं ते म्हणाले.पनवेल तालुका विधी सेवा समिती च्या माध्यमातून दर दोन महिन्यांनी लोक अदालत हा उपक्रम राबविला जातो, वंचित स्तरावरील नागरिक या अभियानाचा देखील लाभ उठवू शकतात असे देखील ते म्हणाले.        

हे अभियान राबवत असताना ग्राउंड झिरो वर सातत्याने कार्यमग्न असणाऱ्या एडवोकेट रिद्धी मुनोथ यांनी आपले अनुभव उपस्थितांसमोर विशद केले.त्या म्हणाल्या की नागरिकांना न्याय मिळवणे हा तुमचा हक्क आहे! हे समजावून सांगताना अत्यंत समाधान लाभत होते.पंचेचाळीस दिवस कसे गेले ते कळलेच नाही,आजही असे वाटते की कालच अभियान सुरू झाले आणि आज ते लगेच संपत आहे.या अनुभवाने एक वकील म्हणून मला समृद्ध केले आहे. आयुष्यभरासाठी चिरकाल स्मरणात राहील असा अनुभव या अभियानातून मला मिळाला.या अभियानात काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी तमाम वरिष्ठांचे आभार मानते.
       

सांगता समारंभाच्या आयोजनाची जबाबदारी पनवेल तहसीलदार कार्यालयाने अत्यंत चोखपणे पार पाडली.याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना तहसीलदार विजय तळेकर म्हणाले की या अभियानात आम्हाला आमचा खारीचा वाटा देता आला याचे समाधान वाटते.लोकांपर्यंत पोहोचून “न्याय सर्वांसाठी” याचा प्रसार करत असताना लोकांना इथपर्यंत आणून मार्गदर्शन करता येईल का? याची देखील आम्ही चाचपणी केली आणि त्या प्रयोगातून ज्येष्ठ नागरिकांचे मार्गदर्शन शिबीर अत्यंत यशस्वीपणे संपन्न करू शकलो.       

आपल्या अध्यक्षीय भाषणातून मनोगत व्यक्त करताना माधुरी आनंद म्हणाल्या की पनवेल तालुका विधी सेवा समिती च्या तमाम सदस्यांनी स्वतःला झोकून देऊन या अभियानात अत्यंत प्रशंसनीय काम केले आहे, आपल्या विभागातील विधि महाविद्यालयाच्या प्राचार्य आणी विद्यार्थी यांनि हिरीरीने घेतलेला सहभाग कौतुकास्पद आहे.एडवोकेट रिद्धी मुनोथ यांच्या अथक परिश्रमांचे आणी नाटिकांतून केलेल्या ॲडव्होकेट नागेश हिरवे यांच्या अभिनय  कौशल्याचे त्यांनी विशेष कौतुक केले.       

प्रिंट मीडिया तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या  सेलचे अध्यक्ष पदाची जबाबदारी श्री साई संस्थान वहाळ चे संस्थापक अध्यक्ष रवीशेठ पाटील यांनी अत्यंत चोख पणे पार पाडली.त्यांनी केलेल्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल माधुरी आनंद यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
अभियानात सहभागी झाल्याबद्दल एमिटी कॉलेज चे संचालक खुशाल विभुते, बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजचे मुख्याध्यापक साखरे,टी एम व्ही विधी महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रा.वर्षा बडवे,बंठिया हायस्कुल चे मुख्याध्यापक माळी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.     

जिल्हा न्यायाधीश तथा पनवेल तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष माधुरी आनंद,जिल्हा न्यायाधीश,वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय आर एस भाकरे,जिल्हा न्यायाधीश एम एम राव,जिल्हा न्यायाधीश कनिष्ठ स्तर एन आर इंदलकर,जिल्हा न्यायाधीश कनिष्ठ स्तर ए ए पांडे,जिल्हा न्यायाधीश कनिष्ठ स्तर एस ए सोनवलकर, तहसीलदार विजय तळेकर, पनवेल महानगर पालिकेच्या सहाय्यक आयुक्त तृप्ती सांडभोर, पनवेल बार असोसिएशनचे अध्यक्ष एडवोकेट मनोज भुजबळ, श्री साई देवस्थान वहाळ चे संस्थापक अध्यक्ष रवी शेठ पाटील, आदी मान्यवरांच्या सह विधी महाविद्यालयाचे प्राचार्य, विद्यार्थी, वकील बांधव,जिल्हा न्यायालयातील कर्मचारी वृंद,  पनवेल तहसील कार्यालयातील कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होता.

ग्राउंड झिरो वर सातत्याने कार्यमग्न असणाऱ्या एडवोकेट रिद्धी मुनोथ यांचा सत्कार करण्यात आला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.