मनसे शहरअध्यक्ष दर्पण दरेकर यांचे आमरण उपोषण
चौपदरीकरणासंदर्भातील समस्यांचा पाठपुरावा
सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर |
शहरातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणादरम्यान वाहतुकीच्या नवीन समस्या आणि गैरसोयी निर्माण झाल्या असून यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष दर्पण दरेकर यांनी जाहिर केलेले आमरण उपोषण आज, बुधवार, दि. 10 नोव्हेंबर 2021 पासून सुरू होत आहे. प्रशासनाने दर्पण दरेकर यांना या उपोषणापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करण्यासाठी आयोजित केलेली चर्चेची बैठक निष्फळ ठरल्याने दरेकर यांनी उपोषणाच्या निर्णयावर ठाम असल्याचे जाहिर केले.
पोलादपूर शहरातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग अंडरपास स्वरूपाचा व बॉक्स कटींग पध्दतीचा होत असून यातील नियोजनाअभावी सद्यस्थितीत तसेच भविष्यातही पोलादपूरवासियांची मोठी गैरसोय होणार आहे. यासंदर्भात विविध संस्था व व्यक्तींनी प्रशासनाचे लक्ष वेधण्याचे केलेले प्रयत्न महामार्ग बांधकाम विभागाने सातत्याने दूर्लक्षित करून मनमानीपणे ठेकेदार कंपनीने नियोजन आराखडयात नसलेल्या पुलांचे बांधकाम सुरू केले आहे आणि आवश्यक तिथे बांधकाम करण्याऐवजी काही बाधितांच्या आग्रहाला बळी पडून मंजूर आराखडयाखेरीज अधिक पुल बांधणी केली आहे. सर्व्हिस रोड अरूंद आणि निर्धारित अंतर लांबीचे करण्याचे हेतूपुरस्सरपणे ठेकेदार कंपनीने टाळले आहे. त्यामुळे पोलादपूर शहरातील प्रभातनगर पूर्व, भैरवनाथ नगर, आनंदनगर तसेच पोलादपूर शहरातील नागरिकांना छ.शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळयापासून वळसा घालून पुर्वेकडील सर्व्हिसरोडवरून पश्चिमेकडील सर्व्हिस रोडवर जाऊन प्रवास करावा लागणार आहे तसेच पश्चिमेकडील सर्व्हिस रोडलगतच्या गोकुळनगर, घाटेआवाड, तांबडभुवन, खरेदी विक्री संघ, पंचायत समिती आणि रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक शाळेतील विद्यार्थी यांच्यासाठी पोलादपूर शहरामध्ये अथवा एस.टी.स्थानकाकडे येण्यासाठी द्रविडी प्राणायाम करण्याची वेळ ओढवणार आहे.
यासंदर्भात, महाड येथील राष्ट्रीय महामार्ग उपविभागाच्या उपकार्यकारी अभियंता आकांक्षा मेश्राम यांना पोलादपूर शहर अध्यक्ष दर्पण दरेकर यांनी मनसेचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष चेतन उतेकर, पंकज उमासरे, दीपक चव्हाण, चंद्रहास नगरकर यांच्यासमवेत भेटून इशारावजा निवेदन दिले. या निवेदनानुसार कोणतीही उपाययोजना न करता इशारा देणाऱ्यास आमरण उपोषणापासून परावृत्त करण्याचे सोपस्कार पूर्ण करण्यासाठी पोलादपूर तहसिल कार्यालयामध्ये तहसिलदार दिप्ती देसाई यांच्या अध्यक्षतेखाली उपकार्यकारी अभियंता आकांक्षा मेश्राम, कनिष्ठ अभियंता म्हाडकर आणि सहायक पोलीस निरिक्षक प्रशांत जाधव यांच्या उपस्थितीत मनसे शहर अध्यक्ष दर्पण दरेकर यांना चर्चेस निमंत्रित करून बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी दर्पण दरेकर यांनी श्रीकाळभैरवनाथ देवस्थानासमोर दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी तसेच गुरे जनावरे यांच्यासाठी व्हेईक्युलर अथवा कॅटल अंडरपास उभारण्याची मागणी केली. यावेळी मंजूरीविना पुल उभारणाऱ्या ठेकेदार कंपनी आणि कंपनीच्या आर्थिक कामावर लक्ष ठेवणाऱ्या कंपनीला काळया यादीत टाकण्याच्या मागणीबाबत कनिष्ठ अभियंता म्हाडकर यांनी विषयांतर करू नका, असा आग्रही सूर धरला.
मात्र, कोणतेही समाधान न करताच राष्ट्रीय महामार्ग उपविभागाच्या उपकार्यकारी अभियंता आकांक्षा मेश्राम यांनी परावृत्त करण्याचा असफल प्रयत्न करून सोपस्कार पूर्ण केल्याने मनसे शहर अध्यक्ष दर्पण दरेकर यांनी आमरण उपोषणाच्या इशाऱ्यानुसार बुधवारी सकाळी साडेदहा वाजल्यापासून सुरूवात करणार असल्याचे ठामपणे सांगितले. यावेळी मनसे अध्यक्ष दर्पण दरेकर यांनी पोलादपूर या तालुक्याचे प्रमुख शहर असलेल्या ठिकाणी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे निर्माण झालेल्या समस्यांबाबत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळयाजवळ आमरण उपोषणाद्वारे नागरिकांच्या समस्यांवर समाधान निघेपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचे जाहिर केले आहे. यावेळी पोलादपूर तालुक्यातील जनतेने उपस्थित राहून सहकार्य करण्याचे आवाहनही दर्पण दरेकर यांनी केले आहे.








Be First to Comment