Press "Enter" to skip to content

गोरेगाव येथे आंबेडकर स्मारक

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी २ कोटी २२ लाख निधी मंजूर

सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |

गोरेगावच्या परिसरात आंबेडकरी चळवळीचे एक उत्तम केंद्र उभे रहावे यासाठी पंचशील बौध्दजन सेवा संघ या संस्थेचे अथ्यक्ष विकास गायकवाड माझ्याकडे सातत्याने पाठपुरावा करीत होते. मी ज्या ज्या वेळी गोरेगावला यायचो त्यावेळी गोरेगाव मधील सामाजिक चळवळीचा उल्लेख करत आलो आहे. सरकारमध्ये असतांना या परिसारात ५०-६० लाखांच्या निधीमधून एक चांगली वास्तू त्यावेळी उभी राहिल्याचे पहावयास मिळाले. तिथे एक बहुउद्देशीय सभागृह असावे ज्यामधून आपल्याला चालना मिळेल म्हणूनच या प्रकल्पाचा प्रस्ताव पाठविण्यात आला पण तो वर्षभर पडून होता. नंतर जेव्हा पालकमंत्री आदितीताई यांनी हा प्रस्ताव सामाजिक न्याय खात्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे ठेवला तेव्हा मी सातत्याने याविषयी पाठपुरावा केला. त्यानंतर या प्रस्तावावर ना. धनंजय मुंडे यांनी बैठक घेऊन हा प्रस्ताव मंजूर झाल्याचे मला कळविले. या प्रकल्पाच्या सुमारे सव्वा दोन कोटी रुपयांच्या निधीचे मंजूरीच्या आदेशाचे पत्र संस्थेकडे सुपूर्द करतांना मला विशेष आनंद होत असून पुढील वर्षीच्या दिवाळी पर्यंत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम पूर्ण होऊन या स्मारकातून ऐतिहासिक पाऊलखुणा व पाऊलवाटा जपण्याचे काम होईल असे मत खा. सुनील तटकरे यांनी व्यक्त केले.

अनुसूचीत जाती व नवबौध्द घटकांतील मान्यवर व्यक्तींचे स्मारक बांधणे तसेच अनुसूचीत जातीसाठी सांस्कृतिक व ऐतिहासिक दृष्ट्या महत्व असलेल्या स्थळांचा विकास करणे व अनुसूचीत जातीच्या सांस्कृतिक व नीतिमूल्यांवर आधारित विकास साधणा-या प्रकल्पांसाठी स्वयंसेवी संस्थांना अनुदान मंजूर करणे या योजनेअंतर्गत पंचशील बौध्दजन सेवा संघ, या संस्थेद्वारे गोरेगाव (ता.माणगाव) या ठिकाणी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक बहुउद्देशीय इमारत प्रकल्प उभारणे या कामासाठी खा. सुनील तटकरे यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या सहकार्याने २ कोटी २२ लाख, ६६,९२६ एवढ्या प्रचंड रकमेचा निधी मंजूर नुकताच मंजूर झाला. निधी मंजूर झाल्याचे पत्र पंचशील बौध्दजन सेवा संघ या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले त्यावेळी खा. सुनील तटकरे बोलत होते.

सुतारवाडी येथील “गीताबाग” मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला बौध्दजन सेवा संघ संस्थेचे अध्यक्ष विकासदादा गायकवाड़, रामदास महाडिक, संतोष साळवी, चंद्रमणी साळवी, संदीप साळवी, सुभाष गायकवाड़ गुरुजी, दिलिप साळवी, सुप्रिया साळवी, उदय गायकवाड़, सिध्दार्थ शिंदे, निलेश साळवी, राष्ट्रवादीचे नागोठणे विभागीय नेते भाई टके, राष्ट्वादी युवक काँग्रेसचे रोहा तालुका अध्यक्ष जयवंत मुंडे, विलास चौलकर आदींसह गोरेगाव येथील पंचशील बौध्दजन सेवा संघ या संस्थेचे पदाधिकारी व समाजबांधव यावेळी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.