Press "Enter" to skip to content

कडसुरे ग्रामस्थांचा इशारा

रिलायन्सच्या सौर उर्जा प्रकल्पाचे काम ठेकेदाराने न थांबविल्यास उग्र आंदोलन

गाव बैठकीत कडसुरे ग्रामस्थांचा रिलायन्स व्यवस्थापनाला इशारा

कंपनीजवळ चर्चा करण्याचा गाव कमिटीलाच अधिकार असल्याचा केला ठराव

सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या नागोठणे युनिट अंतर्गत कडसुरे गावाच्या हद्दीत प्रस्तावित असलेल्या रिलायन्सच्या सौर उर्जा प्रकल्पासाठी संबधित जागेवरील झाडे तोडण्याचे काम कडसुरे गावातीलच दोन ठेकेदारांना हाताशी धरून कंपनीने सुरु केले आहे. मात्र या प्रकल्पाच्या बाबतीत ग्रामस्थांना कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता सुरु केलेले हे काम ठेकेदारांनी न थांबविल्यास तसेच व्यवस्थापनाला सादर केलेल्या निवेदानांतील १७ प्रमुख मागण्यांवर चर्चा करण्यासाठी गाव कमिटीशी तातडीने बैठक न घेतल्यास रिलायन्स व्यवस्थापनाविरोधात उग्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा कडसुरे ग्रामस्थांच्या गाव बैठकीत देण्यात आला आहे.

कडसुरे गावातील हनुमान मंदिरात संपन्न झालेल्या या गाव बैठकीला गाव कमिटीतील अरुण शिर्के, दिलीप शिंदे, महेश शिंदे, विकास शिंदे, दत्तात्रेय शिंदे, भालचंद्र शिर्के, दिनेश हि. शिर्के, रमेश शिर्के, राजेंद्र शिंदे, रवींद्र शिर्के, तेजेश शिर्के, यशवंत शिर्के, काशीराम गव्हंडकर आदींसह ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रकल्पासंदर्भात कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा करण्याचा अधिकार फक्त गाव कमिटीला राहील. कडसुरे ग्रामपंचात बॉडीचा यामध्ये कोणताही हस्तक्षेप राहणार नाही असा ठराव अरुण शिर्के यांनी याच बैठकीत मांडला. त्यास सर्व ग्रामस्थांनी एकमुखी पाठींबा दिला.

आय.पी.सी.एल. (सध्या रिलायन्स) प्रकल्पासाठी रोहा व पेण तालुक्यातील आणि नागोठणे परिसरातील अनेक महसुली गावांतील जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. प्रकल्प उभा राहिल्यानंतरही मोठ्या प्रमाणातील संपादित जागा मोकळीच राहिली होती. अशाच प्रकारे संपादित जागेपैकी कडसुरे व कुहीरे गावांच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात असलेल्या मोकळ्या जागेवर सुरुवातीस एरंड या वनस्पतीची व नंतर आंब्याची लागवड करण्यात आली होती. यापैकी बहुतांश जागा ही कडसुरे गावाच्या हद्दीत आहे. कडसुरे व कुहीरेतील याच मोकळ्या जागेवर सध्या रिलायन्स कंपनीकडून त्यांच्या प्रस्तावित सौरउर्जा प्रकल्पासाठी कडसुरे येथील दोन ठेकेदारांकडून कडसुरे हद्दीत तर कुहीरे येथील दोन ठेकेदारांकडून कुहीरे हद्दीत आंब्याची कलमे काढून ती दुसरीकडे नेण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.

यातील कडसुरेतील ठेकेदार राजेंद्र शिंदे हे स्वतः सरपंच असूनही पूर्वीच्या आयपीसीएल प्रकाल्ग्रस्तांवर झालेला अन्याय सर्वश्रुत असतांनाही त्यांनी ग्रामस्थांना विश्वासात न घेता काम सुरु करणे हे गावाच्या हिताला बाधा आणणारे असल्याने गाव कमिटीतील प्रमुख नेतृत्व अरुण शिर्के यांनी तीव्र संताप व्यक्त केला. तर विकास शिर्के यांनीही तीव्र शब्दांत आपल्या भावना व्यक्त करतांना सांगितले की, गावाच्या मुळावर येईल असे कोणतेही काम ठेकेदाराने करून नये. त्यांचे काम दुसऱ्याला दिले जाणार नाही याची शाश्वती आम्ही देत असून हिंमत असेल तर रिलायन्सने आमच्या मागण्यांवर चर्चा केल्याशिवाय काम करून दाखवावेच असे जाहीर आव्हानही यावेळी केले. तर या कामासाठी टेंडर भरण्यासाठी मला व राजू शिंदे यांना कंपनीने जुलै, २०२१ मध्ये सांगितले होते. मात्र ही माहिती मी त्वरित अरुणभाऊ शिर्के यांना दिल्याने व त्यांनी गावाच्या हितासाठी टेंडर न भरण्याचे मला सूचना केल्याने आपण गावाच्या हितासाठी टेंडर न भरल्याचा गौप्यस्फोट यावेळी रवींद्र शिर्के यांनी केला. मात्र त्याचवेळी गावाचा प्रथम नागरिक या जबाबदार पदावर असूनही कुणालाही काही न सांगता व विश्वासात न घेता टेंडर भरणारे राजेंद्र शिंदे यांच्यावर बैठकीत ग्रामस्थांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. याच बैठकीत दत्तात्रेय शिर्के, दिलीप शिर्के, भालचंद्र शिर्के, तेजस शिर्के आदींनी आपले विचार मांडले.

या बैठकीस उपस्थित असलेले ठेकेदार ए.व्ही. इंटरप्रायजेसचे मालक राजेंद्र शिंदे व साई इंटरप्रायजेसचे मालक समाधान शिंदे यांना हे काम काम तत्काळ थांबविण्यासाठी गाव कमिटीच्या वतीने पत्र देण्यात आले. हे पत्र लगेच व्यवस्थापनाला दाखवून नंतर त्यांच्या सूचनेनुसार पुढील निर्णय घेण्यात येईल असे यावेळी राजेंद्र शिंदे यांनी स्पष्ट केले. त्यासाठी त्यांना एक दिवसाची मुदत देण्यात असल्याचे गाव कमिटीने स्पष्ट केले व काम बंद केले नाही तर होणाऱ्या परिणामास सर्वस्वी ठेकेदार जबाबदार असतील असा इशाराही यावेळी गाव कमिटी व ग्रामस्थांकडून ठेकेदारांना यावेळी देण्यात आला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.