Press "Enter" to skip to content

बँक ऑफ इंडिया चा कर्ज मेळावा

कोरोना संकटात रुंदावलेली दरी मिटविण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त
– शंपा बिश्वास

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

‘कोरोना महामारी संकटात ग्राहक आणि कर्ज देणाऱ्या बँकांची दरी वाढली होती. ती दरी मिटावी. यासाठी हा मेळावा आयोजित केला आहे. दुर्गम भागातील गरीब व गरजू जनतेला व्यवसाय किंवा अन्य कामासाठी बँकांकडून सहकार्य घेऊन मदत करण्याचा आमचा हेतू असून त्यासाठी आम्ही आपल्या दारी आलो आहोत. त्याचा लाभ घेऊन आपण उद्योग व्यवसायाला लागावे. विशेषतः महिला बचत गटांना सहकार्य करून महिलांनासुद्धा व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहोत.’ असे महत्वपूर्ण प्रतिपादन बँक ऑफ इंडियाच्या रायगड विभाग प्रमुख शंपा बिश्वास यांनी व्यक्त केले.

बँक ऑफ इंडिया जिल्हा अग्रणी बँक रायगड यांच्या विद्यमाने कर्जत मधील रॉयल गार्डनच्या सभागृहात भव्य कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शंपा बिश्वास यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून मेळाव्याचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा कृषी अधिकारी उज्वला बानखेले, नायब तहसीलदार सुधाकर राठोड, मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, विस्तार कृषी शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने, मार्केटिंग जिल्हा व्यवस्थापक सिद्धेश राऊळ, तालुका व्यवस्थापक राजू नेमाडे, आदिवासी समाजाचे मनोहर पादिर, रमण पारकर, सौम्या गुज्जर, स्नेहल हंडगर आदी उपस्थित होते.

उप व्यवस्थापक रमण पारकर आणि मनोहर पादिर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विजय कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात, ‘कोरोना काळात आलेली मरगळ झटकण्याचे काम या मेळाव्यामुळे होणार आहे. यामध्ये आठ बँका सहभागी झाल्या असून गेल्यावर्षी तीन हजार नऊशे कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्याचे धोरण होते परंतु प्रत्यक्षात दोन हजार सातशे कोटी रुपयांचे कर्जाचे वाटप करण्यात आले. यावर्षी चार हजार दोनशे अठ्ठावीस कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्याचा मानस आहे. या मेळाव्यात 66 जणांना दोन कोटी शहात्तर लाख रुपयांचे वाटप आज करण्यात आले.’ अशी महत्वपूर्ण माहिती दिली.

उज्वला बानखेले यांनी ‘सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग व कृषी पायाभूत सुविधांची’ सविस्तर माहिती दिली. रवींद्र मर्दाने यांनी, ‘शेतकऱ्यांच्या कौशल्य व शेती उत्पादनाची बाजारपेठ यांचा मेळ बसला तर शेती उद्योग भरभराटीला येईल.’ असे स्पष्ट केले. मनोहर पादिर यांनी, ‘दुर्गम भागातील आदिवासी बांधवांना आपले व्यवसाय – उद्योग करण्यासाठी बँकांचे सहकार्य लाभल्यास त्यांनाही प्रवाहात घेतल्यासारखे होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.

डॉ. पंकज पाटील, सुधाकर राठोड यांनीही मार्गदर्शन करून शासकीय योजनांची माहिती दिली. स्नेहल हंडगर यांनी सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन सौम्या गुज्जर यांनी केले. याप्रसंगी राम ब्रह्मांडे, गौरव पांडे, सुरेंद्र उपाध्ये, विशाल पाटील, दिलीप बडेकर, मनोहर हरपुडे, अरुण वेहले, जयवंत मते आदिंसह ग्राहक व बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.