व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होणारी लयलूट थांबणार,मनसेच्या दणक्यानंतर भात खरेदी केंद्र लवकरच होणार सुरू
सिटी बेल | रायगड | धम्मशील सावंत |
सध्या शेतकऱ्याला वादळी संकट व अतिवृष्टीने बेजार केलेय. निसर्गाचा लहरीपणा व नैसर्गिक आपत्तीने शेतकरी देशोधडीला लागलाय, अशातच शासनाचे काही अन्यायकारक धोरणे शेतकऱ्याच्या मुळावर उठलीत, सुधागड तालुक्यात लवकरात लवकर आधारभूत भातकेंद्र सुरू होऊन शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून होणारी लयलूट थांबावी अशी मागणी सुधागड मनसेने केली होती. या मागणीला यश आले असून लवकरच सुधागडातील भात खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील या आशयाचे पत्र पाली सुधागड नायब तहसीलदार वैशाली काकडे यांनी बुधवारी दि(27)रोजी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
शासनाच्या विविध योजनांची काटेकोरपणे अंमल बजावणी व्हावी तसेच शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय व्हावेत अशी मागणी मनसेने लावून धरली आहे. सुधागड तालुक्यातील भात खरेदी केंद्र ताबडतोब सुरू करावेत अशी मागणी सुधागड मनसेने केली होती. या मागणीचे निवेदन पाली-सुधागड तहसीलदार दिलीप रायण्णावार यांना देण्यात आले होते. मनसेने पुन्हा हीच मागणी घेऊन बुधवारी आंदोलनाची हाक दिली.
यावेळी मनसेच्या मागणीवर प्रशासनाने सकारात्मक भूमिका दर्शवत लवकरच भात केंद्र सुरू होणार असल्याचे लेखी पत्राद्वारे हमी दिली. यावेळी बोलताना वैशाली काकडे म्हणाल्या मनसेच्या मागणीबाबत आज जिल्हा पणन अधिकारी यांच्याशी दुरध्वनी वरून चर्चा झाली असून भात खरेदी करिता शेतकऱ्यांच्या नावाची नोंदणी सुरू आहे,दि.01/11/2021 पासून भात खरेदी केंद्र सुरू होतील असे लेखी पत्राद्वारे आश्वाशीत केले आहे.
यावेळी बोलताना मनसे सुधागड तालुका अध्यक्ष सुनिल साठे म्हणाले की नैसर्गिक आपत्तीने येथील शेतकरी कोलमडला आहे. अतिवृष्टी व परतीच्या पावसाने भातपीक उध्वस्त झाले. यातून ही उरले सुरलेला भात विक्री करावी तर आधारभूत भातकेंद्र सुरू नसतात. दिवाळीचा गोड सण जवळ आला आहे, भातकापणी देखील जोरात सुरू आहे, मात्र भात खरेदी केंद्र दिवाळी नंतर सुरू होतात अशी परिस्थिती दिसून येते. दिवाळी सणाला शेतकऱ्यांच्या हाती पैसे नसतात. परिणामी नाईलाजाने शेतकऱ्यांना आपला भात खाजगी व्यापाऱ्यांना कमी किंमतीत विकावा लागतो. त्यामूळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. म्हणून लवकर भात खरेदी केंद्र सुरू करण्यात यावेत अशी मागणी मनसेने केली होती. प्रशासनाने भात खरेदी केंद्र सुरू होणार असल्याचे लेखी आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
यावेळी मनसे तालुका अध्यक्ष सुनिल साठे , विभाग अध्यक्ष केवल चव्हाण, पाली शहर अध्यक्ष अंकुश चोरगे, शेतकरी अनाजी शिंदे, रोशन खंकाळ, शेखर चव्हाण, परेश वनगले व समीर लोंढे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.








Be First to Comment