Press "Enter" to skip to content

तटकरेंचे षडयंत्र फसले

पेण पालीकेचे गटनेते अनिरुद्ध पाटील यांच्यावरी कलम ३५३, ३५२ पोलिस तपासाअंतर्गत रद्द

अखेर सत्याचा विजय झाला – गटनेते अनिरुद्ध पाटील

सिटी बेल | पेण | वार्ताहर |

पेण नगरपरिषदेच्या १६ ऑक्टोबर २०२० रोजी झालेल्या स्थायी समितीच्या सभेमध्ये तत्कालीन मुख्याधिकारी अर्चना दिवे व गटनेते अनिरुद्ध पाटील यांच्यात झालेल्या वादानंतर मुख्याधिकारी दिवे यांनी गटनेते अनिरुद्ध पाटील यांच्या विरोधात पेण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यानुसार पेण पोलिसांनी कलम ३५३, ३५२ ही कलमे लावण्यात आले होते.त्यानुसार चौकशीअंती सदर कलमे रद्द केल्याची माहिती गटनेते अनिरुद्ध पाटील यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

ते पुढे म्हणाले की, या राजकीय षडयंत्रा मागे पालकमंत्री आदिती तटकरे आणि खासदार सुनिल तटकरे यांनी दबाव आणुन मुख्याधिकारी दिवे यांना माझ्यावर तक्रार दाखल करण्यास भाग पाडले पण नगरसेवक म्हणून जनतेने मला निवडून दिले आहे.त्यामुळे जनतेचे प्रश्न, समस्या सभागृहात मांडणे हे माझे कर्तव्य आहे. त्यानुसार स्थायी समितीच्या बैठकीत मी सदस्य म्हणून सहभागी झालो होतो.यावेळी माझ्याच प्रभागातील नरदास चाळ येथील बेकायदेशीर बांधकामा बाबत प्रश्न उपस्थित करुन जाब विचारला असता मुख्याधिकारी अर्चना दिवे यांनी माझ्या विरोधात मोठमोठ्याने आरडाओरडा करुन खुर्ची उचलून अंगावर मारण्यासाठी धावत जाऊन मला मारण्याची धमकी दिली व सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा पेण पोलिसांत दाखल केला होता.

मात्र पेण पोलिसांनी केलेल्या चौकशी अंती मुख्याधिकारी अर्चना दिवे यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यातील कलम ३५३, ३५२ रद्द करुन कलम १८६ हाच कलम लावून गुन्हा दाखल केला असल्याचे पेण न्यायालयात दाखल केलेल्या चार्जशीट मध्ये म्हटले आहे.त्यामुळे पेण पोलिसांनी केलेल्या चौकशीत अखेर सत्याचा विजय झाला असल्याचे अनिरुद्ध पाटील यांनी म्हटले आहे.

तत्कालीन मुख्याधिकारी अर्चना दिवे यांच्या विरोधात मानहानी चा दावा देखील दाखल करणार असल्याचे अनिरुद्ध पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.