मौन
मला सांगते रेशमी मौन त्याचे
मिटे पान का सारखे लाजरीचे
फुटे पंख कोषातही का अळीला
कशाची पडे भूल वेड्या कळीला
हवासा जरा वाटता स्पर्श कोरा
चढे का उगा स्पंदनांचाच पारा?
न का दर्पणाला पुरे वेळ आता?
कसा श्वास गंधाळतो मी न घेता ?
अता स्वप्न त्याचेच घ्यावे उशाला
नवी रोज प्राजक्तआशा मनाला
जरा रंगवाव्यात वाटा उद्याच्या
जिथे थांबती तारकाही दवाच्या
हरावी कधी पैज मी चांदण्यांची
जुळावी मितीपार नाती मनांची
जरी रेशमी, गोड काही खुपावे
असे बोलके मौन त्याचे असावे
निलिमा देशपांडे, नवीन पनवेल
Be First to Comment