Press "Enter" to skip to content

सिटी बेल आरोग्य कट्टा

ऑक्टोबर हिटमुळे जेष्ठ नागरिक व लहान मुले उष्माघाताने त्रस्त

सिटी बेल | आरोग्य प्रतिनिधी |

ऑक्टोबर हिटमुळे राज्यात विविध ठिकाणी उष्णतेची लाट पसरली आहे. आता या उन्हाच्या झळा मुंबई -ठाणे नवी मुंबईच्या जवळील उपनगरात देखील मोठ्या प्रमाणात बसत असून . तापमानाच्या पाऱ्याने पस्तिशी ओलांडून शहरातील नागरिकांना त्राही त्राही करून सोडले आहे. ऑक्टोबर महिना हा ऋतू परिवर्तनाचा काळ असून यात हवेमध्ये उष्णता आणि दमटपणाचे प्रमाण वाढते. हे वातावरण विषाणूच्या वाढीसाठी पोषक असते.

पावसाळ्यानंतर अचानक बदलत्या तापमानाशी जुळवून घेण्यास शरीराला वेळ लागतो. या काळात रोगप्रतिकारकशक्तीही कमी झालेली असते. त्यामुळे या काळात विषाणूजन्य तापासह संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असते.उन्हामुळे उष्माघाताचे रुग्ण नवी मुंबई व ठाणे जिल्ह्यात वाढत असल्याचे कल्याण येथिल साई आधार हॉस्पिटलतर्फे नोंदविण्यात आले आहे.

याविषयी अधिक माहिती देताना कल्याण येथील साई आधार हॉस्पिटलचे संचालक व वैद्यकीय चिकित्सक डॉ. राहुल तिवारी म्हणाले ” उष्माघात हा प्रामुख्याने वयोवृद्ध, पाणी कमी पिणारे लोक, दीर्घ आजारी किंवा मद्यप्राशन करणा-या लोकांमध्ये आढळतो. अर्भकं व चार वर्षापर्यंतची लहान मुलं, पासष्टीच्या पुढील वृद्ध मंडळी यांना उष्माघाताचा त्रास अधिक सहजपणे होऊ शकतो. गेल्या २ महिन्यात आमच्याकडे येणाऱ्या रुग्णामध्ये जेष्ठ नागरिकांचे प्रमाण ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात वाढलेल्या तापमानांमुळे ज्या जेष्ठ नागरिकांना हृदयरोग, फुप्फुसांचे आजार, मूत्रपिंडाचे आजार, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह आहे त्यांना उष्माघाताची लागण मोठया प्रमाणावर होत आहे. ”

ऑक्टोबर हिट मध्ये लहान मुले व विशेषतः जेष्ठांची काळजी घेणे महत्वाचे आहे भरपूर पाणी पिणे, सावलीत राहणे, सुती आणि सैल कपडे घालणे, कडक उन्हात शारीरिक कष्टाची कामे न करणे अश्या सोप्या गोष्टीनी उष्माघाताचा धोका टाळता येतो. जर तुम्हाला अशक्तपणा जाणवायला लागला असेल, चक्कर यायला लागली असेल, किंवा भ्रमिष्टपणा वाटायला लागल असेल तर तुम्हाला उष्माघाताचा त्रास सुरु आहे असे जाणून वेळेत वरील सोपे उपाय करणे पुढील मोठ्या धोक्यापासून वाचवू शकतात. त्रास चालुंच राहिला तर त्वरित नजीकच्या हॉस्पिटलमध्ये जावून तज्ञांचा सल्ला आणि उपचार घ्यावे असे आवाहन साई आधार हॉस्पिटलतर्फे करण्यात आले आहे.

उष्माघातावर उपचार :
आपल्या आजूबाजूला कोणाला उष्माघाताचा झटका आला वा त्रास होऊ लागला तर त्वरित दवाखान्यात न्यावे.
सर्वप्रथम व्यक्तीला शक्य असल्यास वातानुकूलित जागेत अन्यथा सावलीत वा थंड ठिकाणी हलवावं आणि शरीरावरील जास्तीचे कपडे काढून टाकावेत. त्यामुळे शरीरातील उष्णतापमान कमी होण्यास मदत होते.
शरीराला ओल्या कपडय़ाने पुसून काढावं आणि व्यक्तीच्या आजूबाजूला हवा खेळती ठेवावी.
बर्फ उपलब्ध असल्यास व्यक्तीच्या मानेवर, पाठीवर, काखेत आणि मांडीच्या सांध्यात बर्फाचा शेक द्यायला सुरुवात करावी. कारण वरील जागी रक्तप्रवाह संचय हा त्वचेच्या जवळच असतो व थंडतेमुळे शरीराचे उष्णतामान कमी व्हायला मदत होते.
व्यक्तीवर पाण्याचा वर्षाव करावा किंवा त्या व्यक्तीला बाथटबमध्ये बुडवावे वा बर्फ टाकावा.
व्यक्तीला मूच्र्छा आली असेल तर श्वसनक्रियेची तपासणी करावी.
व्यक्ती शुद्धीवर आल्यावर त्यांना पाणी पिण्यास द्यावं.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.