पेण मध्ये बेकायदेशीर होणा-या सावकारी व्यवसाय विरोधात डॉ.शेखर धुमाळ यांची पोलिसांत तक्रार
सिटी बेल | पेण | वार्ताहर |
पेण शहरासह तालुक्यात बेकायदेशीर सावकारी व्यवसायाने डोके वर काढले असून सावकाराकडून व्याजाने घेतलेले पैसे फेडता अनेकांचे कुटुंब उध्वस्त झाले आहेत.याच अनुषंगाने जोहे येथील डॉ.शेखर धुमाळ यांनाही या बेकायदेशीर सावकारी व्यवसायाचा फटका बसला असून धुमाळ यांनी या बाबत दिपक समेल यांच्या विरोधात पेण पोलिसांत तक्रार दाखल केली असल्याचे त्यांनी पेण येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी त्यांनी अधिक माहिती देताना सांगितले कि, पेण शहरातील गणपती कारखानदार असणारे समेल यांच्या कडून मी काही कामानिमित्त २०१४ साली तीन लाख रुपये दहा टक्के व्याजदराने घेतले होते. त्यावेळी समेळ यांनी माझ्या कडून बँक ऑफ बडोदाच्या जोहे येथील शाखेचे चेक नं.००००२०, चेक नं.००००२१ असे दोन कोरे चेक व ५०० रुपयांचा कोरा बॉण्ड पेपर सिक्युरिटी म्हणून घेतले होते.
मात्र सदरची रक्कम मी त्याचवर्षी व्याज व मुद्देमालासह परत करुन त्याच्याकडे असणारे माझे कोरे चेक व बॉण्ड पेपर परत देण्यास सांगितले असता ते मी फाडून टाकतो म्हणून समेल यांनी त्यावेळी सांगितले.परंतु त्यांनी तसे न करता चेक व बॉण्डचा गैरवापर करून त्यावर अधिकच्या रक्कमा टाकून माझ्या विरोधात न्यायालयात आता २०२१ ला खोटी तक्रार दाखल केली आहे.त्यानुसार मला न्यायालयाचा समन्स आल्यावर मला माहित झाले आहे. मात्र त्याच्याकडून घेतलेले पैसे मी परत केले असून सुद्धा समेल माझ्याकडून बेकायदेशीरपणे सावकारी प्रमाणे पैसे उकळत आहे तरी याबाबतची लेखी तक्रार पेण पोलिस ठाण्यात करण्यात आल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत शेवटी सांगितले.
सदर प्रकरणाचा तक्रार अर्ज आमच्याकडे आला असून याबाबत सखोल चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल मात्र नागरिकांनी देखील पैशांच्या लालसेपोटी अशा प्रकरणाला भुलून न जाता जर असे काही प्रकरणे घडत असतील तर पेण पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.
देवेंद्र पोळ
- पोलिस निरीक्षक पेण








Be First to Comment