‘एक गाव, एक पोलीस’ : नागोठणे विभागातील प्रत्येक गावाला मिळाला हक्काचा पोलीस
पोलिस निरिक्षक तानाजी नारनवर यांची अभिनव योजना
सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |
नागोठणे पोलीस ठाणे हद्दीतील प्रत्येक गावाला हक्काचा पोलीस मिळाला आहे. नागोठणे पोलीस ठाण्याचे निरीक्षक तानाजी नारनवर यांनी पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एक गाव, एक पोलीस’ ही अभिनव योजना सुरु केली आहे. त्यामुळे प्रत्येक गावाला हक्काचा पोलीस तर मिळालाच, शिवाय प्रत्येक पोलिसाला त्याचे कार्यक्षेत्र मिळाल्याने अधिक जबाबदारीने आणि आत्मविश्वासाने ते त्यांचे कर्तव्य पार पाडणार आहेत.
नागोठणे पोलीस ठाणे क्षेत्रांतर्गत ३७ गावे व १२ वाड्यांचा समावेश आहे. प्रत्येक ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचार्यांपैकी मोजकेच कर्मचारी महत्त्वाची कामे करीत असत आणि उर्वरित कर्मचार्यांना बंदोबस्त, समन्स अथवा वायरलेस सेट सांभाळण्यासारखी दुय्यम कामे सांगितली जात. बर्याचदा हे कर्मचारी कामावर आहेत अथवा नाही, याची माहितीही पोलीस निरीक्षकांना मिळत नसे.
ही बाब लक्षात घेऊन उपलब्ध सर्व कर्मचार्यांचा उपयोग करण्यासाठी ‘एक गाव, एक पोलीस’ ही योजना पो.नि. नारनवर यांनी राबविण्यास सुरुवात केली आहे. या योजनेंतर्गत पोलीस ठाण्यातील महत्त्वाची कामे करणारे कर्मचारी वगळता शिल्लक राहणार्या पोलिसांना ठाण्यांतर्गत येणार्या गावाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्या गावातील प्रत्येक घडणार्या घटना, घडमोडींची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
गावांची जबाबदारी दिल्यापासून त्या गावातील अवैध धंदे करणारे, हिस्ट्री शिटर, गुन्हेगार, पोलिसांना मदत करणारे, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते याबाबतची सर्व माहिती त्या पोलीस कर्मचार्यांना मिळू शकेल. गावातील तरुणांच्या व्हॉट्स अॅप या सोशल मीडियावरील ग्रुपमध्ये त्यांना घेण्यात येईल. परिणामी गावातील प्रत्येक घटनेची माहिती लगेच त्यांच्यापर्यंत येऊ लागेल.
लहान मोठ्या घटना आणि त्यांचे भविष्यात होणारे परिणाम, याबाबत हे पोलीस गावकर्यांना मार्गदर्शन करु लागतील. परिणामी गावासाठी तो पोलीस कर्मचारी त्यांच्या हक्काचा माणूस बनेल. ‘पोलीस आणि जनता यांच्यातील दुरावा कमी करण्याचा उद्देश’ यामागे असून ‘एक गाव, एक पोलीस’ या योजनेचा मूळ उद्देशच उपलब्ध सर्व मनुष्यबळ जनसेवेसाठी वापरणे हा आहे.
पूर्वी सामान्यांना तक्रार करण्यासाठी ठाण्यात जायचे असेल तर तो एखाद्या राजकीय पक्षाच्या स्थानिक पुढार्याला सोबत नेत असे. आता गावातच हक्काचा पोलीस उपलब्ध झाल्याने सामान्यांना आता मध्यस्थांची आवश्यकता भासणार नाही. एवढेच नव्हे तर पोलिसांना एक कार्यक्षेत्र मिळाल्याने त्यांच्यातील आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल. या योजनेमुळे पोलीस आणि जनता यांच्यातील दुरावा कमी होऊन तक्रारदारांचा पोलिसांवरील विश्वास वाढेल, असा दृढ विश्वासही नागोठण्याचे पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांनी व्यक्त केला आहे.








Be First to Comment