Press "Enter" to skip to content

प्रतिक्षा नगरपंचायत निवडणुकीची

पोलादपूरकरांचे डोळे वाट पाहताहेत नगरपंचायत निवडणुकीची :
महाआघाडी की स्वतंत्र लढतीचे चित्र ? राजकीय खलबतं सुरू !

मतदार यादी पुनरिक्षण व प्रसिध्दीचा कार्यक्रम जाहिर

सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर |

तालुक्याच्या ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये करण्याच्या निर्णयानंतर पोलादपूर ग्रामपंचायतीची दोन वर्षांची सत्ता संपुष्टात येऊन नगरपंचायतीमध्ये रूपांतर होऊन निवडणुका जाहिर होईपर्यंत तहसिलदारांनी प्रभारी कार्यभार सांभाळला होता. तशीच परिस्थिती या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर पाच वर्षांचा कालावधी लोटल्यानंतर गेल्या तब्बल 9 महिन्यांपासून महाडच्या प्रांताधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत प्रशासकीय कामकाज सुरू असल्याने आता पोलादपूरकरांचे डोळे नगरपंचायतीच्या दुसऱ्या पंचवार्षिंक निवडणुकीची वाट पाहात आहेत.

दरम्यान, राज्यातील महाआघाडी सरकारच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायतीमध्येही महाआघाडी निवडणूकपूर्व लढणार की सर्व पाच पक्ष स्वतंत्र लढणार याबाबत राजकीय खलबतं सुरू आहेत. मतदार पुनरिक्षण कार्यक्रमासह अंतिम मतदार यादी प्रसिध्दीचा कार्यक्रमही जाहिर झाल्याने आता पुन्हा पोलादपूर शहरातील राजकीय हालचालींना सुरूवात झाली आहे.
2011 च्या राष्ट्रीय जनगणनेनुसार 2014 मध्ये पोलादपूर ग्रामपंचायत आणि त्यानंतर झालेल्या पोलादपूर नगरपंचायतीच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम 2016 मध्ये पार पडला. 24 जानेवारीपासून 24 फेब्रुवारीपर्यंतच्या पहिल्या 30 दिवसांसाठी प्रशासकाची मुदत संपुष्टात येऊन पुढील प्रशासकीय कार्यकाळ सुरू झाला.

आजमितीस प्रशासक म्हणून महाड उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी कामकाज चालविले असून या काळात कोविड-19 लॉकडाऊन, निसर्ग वादळ तसेच अतिवृष्टीचा फटका पोलादपूर शहरवासियांना बसल्याने मोठया प्रमाणात प्रशासकीय कामकाजावरील निरंकूशपणाची अगतिकता सर्व राजकीय पक्षांना जाणवली आहे. 24 जानेवारी 2021 रोजी पाच वर्षांचा कार्यकाळ संपल्याने नगरपंचायतीचा कार्यभार प्रशासक म्हणून महाड प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी स्विकारल्यानंतरही बरखास्त नगरपंचायतीचे सदस्य व पदाधिकारी शहरातील अंदाजपत्रक आणि आर्थिक मंजूरी नसलेल्या विकासकामांचे नारळ फोडत असल्याचे दृश्य जागोजागी दिसूनही यावर आचारसंहिता नसल्याने अंकूश बसू शकला नाही.

दुसऱ्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रभागरचना आणि प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीनंतर मतदारांची अंतिम यादी निश्चित करण्यासंदर्भात महाड उपविभागीय अधिकारी तथा नगरपंचायतीच्या प्रशासक प्रतिमा पुदलवाड यांनी आयोजित केलेल्या बैठकीवेळी काँग्रेस पक्षाने घेतलेल्या आक्षेपानुसार पोलादपूर शहरातील 5 हजार 672 मतदारांपैकी मतदार यादीतील रानबाजिरे व चोळईतील 200 मतदार संख्या कमी केल्यानंतर सद्यस्थितीत असलेली 5 हजार 62 मतदार यादीचे प्रारूप पाहता सुमारे 350 ते 400 मतदारसंख्या कमी करण्यात आल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. 17 प्रभागातील सुमारे 200 हून अधिक मतदारांची आक्षेपपत्र जोडण्यात आली आहेत.

सुमारे 300 हून अधिक मतदारांचे अर्ज आल्यानंतर त्याबाबत छाननी व अन्य प्रक्रिया पूर्णत्वास जाण्याची अपरिहार्यता निर्माण झाली. गेल्या अनेक वर्षांपासून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे छाननी या विषयावर एकमेकांविरूध्द आक्षेप न घेण्याचे साटेलोटे धोरण या मतदार यादीच्या निश्चितीवेळी दिसून न आल्याने सत्ताधारी आणि विरोधकांतील संघर्षाची पुसटशी किनार पाहण्यास मिळाली.

पोलादपूर नगरपंचायतीमध्ये पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये शिवसेना सर्वाधिक सदस्यसंख्या असलेला सत्ताधारी पक्ष असताना काँग्रेसने पोटनिवडणुकीवेळी विरोधी पक्ष म्हणून असलेली मान्यता गमावली तर मनसे, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकापक्षाने नगरपंचायतीमध्ये चंचूप्रवेशही केला नाही.

लॉकडाऊनकाळानंतर तातडीने प्रशासक नेमण्याऐवजी दुसरी पंचवार्षिक निवडणूक जाहिर झाली असती तर पोलादपूर नगरपंचायतीच्या विविध विकासकामांची भुमिपुजनं व शुभारंभ झाल्यानंतर तीन कोटींच्या विकासनिधीची चर्चा शिवसेनेला पुन्हा सत्तेत बसविण्यास कारणीभूत ठरली असती.

दुसरी पंचवार्षिक निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्यानंतर आगामी निवडणुकीमध्ये महाआघाडीने एकत्रित निवडणूक लढवावी अथवा निवडणुकीनंतर एकत्र यावे, याबाबत आघाडीतील स्थानिक घटकपक्षांना पुरग्रस्तांना तसेच निसर्ग वादळग्रस्त आणि लॉकडाऊन काळातील मदत वाटपावेळी आपसात चर्चेची संधी प्राप्त झाली. नगरपंचायतीमधील काँग्रेस आणि शिवसेना हे कट्टर प्रतिस्पर्धी पक्ष याचधर्तीवर मानवी साखळी आंदोलनामध्ये एकत्र दिसल्याने या महाआघाडीची नांदी दिसून आली तर या सर्व काळामध्ये काँग्रेसचे नेते माजी आमदार स्व.माणिक जगताप यांची उणीव पोलादपूरकरांना जाणवली असल्याने पोलादपूरकर आगामी निवडणुकीमध्ये त्यांचा कौल काय तो काँग्रेसजनांना देतील, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

पोलादपूर शहरात आगामी काळात महाआघाडी झाल्यास शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्याविरोधात भाजपा थेट लढत घेईल तर मनसे एकला चलो रे चा पवित्रा घेऊन लोकांचे कौतुकास्पद मतदान पदरी पाडेल.

आगामी काळात पोलादपूर नगरपंचायतीच्या दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 1 नोव्हेंबर 2021 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत दावे आणि हरकती दाखल करण्यात येतील. यापूर्वी मतदारांची यादी निश्चित करण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीवेळी प्रांताधिकारी तथा पोलादपूर नगरपंचायतीच्या प्रशासक प्रतिमा पुदलवाड यांच्याकडे दाखल केलेल्या दावे आणि हरकतींचा यावेळी समावेश होणार अथवा कसे यासंदर्भात स्पष्टता दिसून येत नसून या दावे आणि हरकती निकाली काढण्यासाठी 20 डिसेंबर 2021 ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. यानंतर दि.05 जानेवारी 2022 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे.

पोलादपूर नगरपंचायतीच्या यापुर्वीच्या मतदार यादीसंदर्भातील दावे व हरकतीच्या बैठकीवेळी पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीवेळी निवडून आलेल्या शिवसेना आणि काँग्रेस तसेच निवडून न आलेल्या मनसे आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप व हरकतीचे विविध मुद्दे मांडले होते. मात्र, आता लॉकडाऊननंतरच्या काळात नगरपंचायतीतील प्र्रमुख दोन पक्षांतील जवळीक काही कारणास्तव वाढल्याने आगामी दावे आणि हरकतीच्या बैठकीवेळी प्रमुख पक्षांची भूमिका काय असेल, यावरच महाआघाडीची समीकरणे स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.