कु.मेघ पोटेच्या बासरीवादन कलेने नागोठणेकर भारावले : दस-या निमित्त श्री जोगेश्वरी मंदिरात कार्यक्रम
सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |
नागोठणे शहरातील मराठा आळीतील रहिवासी, उत्तम बासरी वादक तसेच बासरी वाद्याचे निर्माते निलेश बाळाराम पोटे यांचे चिरंजीव कु.मेघ निलेश पोटे याने दस-या निमित्त ग्रामदेवता श्री जोगेश्वरी मंदिरात सादर केलेल्या बासरी वादनाच्या कार्यक्रमाने उपस्थित नागोठणेकर भारावून गेले. सकाळी १०.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत सुमारे दिड तास बासरी वादनाची कला विविध प्रकारे सादर करतांना कु. मेघ याने उपस्थितांची दाद मिळविली.

जगप्रसिद्ध बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे शिष्य असलेले जगप्रसिद्ध बासरीवादक पंडित रूपक कुलकर्णी यांचा शिष्य असलेल्या आठ वर्षीय कु. मेघ याने नुकताच कोर इन्स्टिट्युट ऑफ म्युझिक, कँनडा आयोजित आंतरराष्ट्रीय आॅनलाईन संगीत स्पर्धेत भारत देशाचे प्रतिनिधित्व करतांना तब्बल २०० स्पर्धकांधून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. याबद्दल त्याचा नवरात्रौत्सव समितीकडून यावेळी सत्कारही करण्यात आला. कु. मेघ याच्या बासरीवादनाला पाली येथील सर्वेश गुरव व नागोठण्यातील पुष्कर महाजन यांनी तबलावादनाची साथ दिली.
या बासरीवादन कार्यक्रमास उत्सव समितीचे अध्यक्ष बाळासाहेब टके, अनिल नागोठणेकर, बबन मोरवणकर, हनुमान बेलोसे, विजय शहासने, प्रकाश मोरे, बाळाराम पोटे, बिपीन सोष्टे, सुरेश जैन, विलास भोनकर, मंगेश कामथे, जगदीश दिवेकर, अक्षय नागोठणेकर, निलेश पोटे, प्रफुल्ल नागोठणेकर, गोट्या राजिवले, राजू जोशी आदींसह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.








Be First to Comment