पेण तलाठी संघटनेचे तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन : राज्य समन्वयक रामदास जगताप यांच्या वक्तव्याचा केला जाहीर निषेध
सिटी बेल | पेण | वार्ताहर |
राज्यामध्ये येणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्ती नंतर संबंधित शेतकऱ्यांना पंचनामे करून त्याचा मोबदला कशाप्रकारे लवकरात लवकर मिळेल यासाठी एक संदेश तलाठी संघाचे अध्यक्ष दुबल अप्पा यांनी सर्वांना दिला होता, मात्र या संदेशाबाबत ई – महाभूमी प्रकल्पाचे राज्य समन्वयक अधिकारी रामदास जगताप यांनी ” मूर्खासारखा असा संदेश सोशल मीडियावर का टाकला आहे” अशी प्रतिक्रिया दिल्याने संतप्त झालेल्या राज्यातील सर्व तलाठी संघटनांनी आज तालुका स्तरावर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून या वक्तव्याचा जाहीर निषेध केला.
राज्यातील अतिवृष्टी आणि त्यानंतर उद्भवलेली नैसर्गिक आपत्तीची परिस्थिती पाहता संबंधित शेतकऱ्यांना त्याचा जास्तीत जास्त लवकरात लवकर लाभ कसा मिळेल या हेतूने महाराष्ट्रात युद्ध पातळीवर शेती नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. त्याही परिस्थितीत तलाठी, मंडळ अधिकारी संवर्ग शासनाने प्राधान्य क्रमाने ई पिक पाहणी आणि मोफत सातबारा वाटप ही महत्त्वाची कामे दिवस रात्र करत आहेत. अशा प्रकारे लोकसेवा करत असताना एका वरीष्ठ अधिकाऱ्यांनी अशी असंस्कृत भाषा वापरणे योग्य नसून हे वक्तव्य अतिशय बेजबाबदार पानाचे असल्याचे गृहीत धरून आज संपूर्ण राज्यात तालुका स्तरावर तलाठी संघटनांनी धरणे आंदोलन करून या वक्तव्याचा जाहीर निषेध केला आहे.
यावेळी तलाठी संघटनेचे पेण तालुका अध्यक्ष आर जे सूर्यवंशी, उपाध्यक्ष एस. एल. विधाते, सचिव गंगाधर कोरडे, खजिनदार सारिका तांडेल, सल्लागार सुरेंद्र ठाकूर, संघटक निनाद पाध्ये, विलास म्हात्रे, मदन कारोटे यांसह तलाठी व मंडळ अधिकारी उपस्थित होते.








Be First to Comment