पोलादपूर तालुक्यात सूक्ष्म उद्योजकता वाढीसाठी पुन्हा व्यापक प्रयत्न : बँकांसह तालुका कृषी कार्यालय घेणार पुढाकार
सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर |
तालुक्यातील विविध प्रकारच्या सूक्ष्म आणि लघू उद्योगांना प्रोत्साहन देण्याकामी पुन्हा एकदा व्यापक प्रयत्न सुरू होणार असून राष्ट्रीयकृत बँका आणि तालुका कृषी कार्यालयाच्या पुढाकाराने नजिकच्या काळात सर्व प्रकारचे सूक्ष्म व लघू उद्योग केंद्र सरकारच्या नवीन सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग खात्याच्या माध्यमातून अधिकाधिक प्रमाणात उभारण्यात येण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले. प्रक्रिया उद्योजक व महिला बचत गटांचे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना तसेच सामूहिक शेती या विषयावर यावेळी प्रशिक्षण घेण्यात आले.
पोलादपूर शहरातील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे सभागृहामध्ये सूक्ष्म उद्योजकता वाढीसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी व्यासपिठावर रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्या सुमन कुंभार, पं.स.सदस्य यशवंत कासार, प्रगतशील शेतकरी उद्यानपंडीत रामचंद्र कदम, बॅक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक विनीत, युनियन बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक सुनील कुमार, कापडे बुद्रुक ग्रुपग्रामपंचायतीच्या सरपंच सुवर्णा सकपाळ, तालुका कृषी अधिकारी सुरज पाटील, विविध उद्योग करणारे रामदास कळंबे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक कपिल पाटील तसेच सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांचे पुनरूज्जीवन करणाऱ्या यंत्रणांचे प्रतिनिधी व्यासपिठावर उपस्थित होते.
याप्रसंगी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेचे डिस्ट्रिक्ट रिसोर्स पर्सन राहुल जोशी यांनी नवीन उद्योग व असलेले जुने उद्योग सक्षम करण्यासाठी कर्ज बँकेकडून कसे घेता येईल व त्याला शासन 35 टक्के अनुदान देय आहे याबाबत सविस्तर माहिती सांगितली. याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी सुरज पाटील यांनी कृषी विभागाच्या विविध योजना व सामूहिक शेती सामूहिक भाजीपाला लागवड करावी, त्यास मार्केट उपलब्ध आहे. विकेल तिथे पिकेल अंतर्गत आठवडा बाजार पोलादपूर तालुक्यात सुरू आहे यात शेतकऱ्यांना थेट विक्री केल्यामुळे चांगला दर मिळेल, अशी ग्वाही दिली.
यावेळी पोलादपूर तालुक्यातील उद्योजक शैलेश पालकर यांनी अनुभव सांगताना, बुडीत कर्ज झालेल्या उद्योजकांना योग्य कर्जपुरवठा झाला नाही, अनुदानाच्या रकमा अडवून ठेवल्या गेल्या, कमर्शियल दराने विद्युत पुरवठा होऊ लागल्याने संघर्षाची भूमिका घेतल्यानंतर इंडस्ट्रीयल दराने विद्युतपुरवठा करण्यास सुरूवात झाली. मात्र, विद्युतपुरवठा लोडशेडींग कार्यक्रमामुळे बंद झाला, कामगारांना लोडशेडींगमुळे विनाकाम पगार करणे भाग पडले आणि सरकारी असंबंध्दतेमुळे अनेकांचे उद्योग बंद होऊन तालुक्यातील उद्योजकता लयास गेली. अलिकडेच, लॉकडाऊनमुळेही उरले सुरले उद्योजक संपुष्टात आले आहेत. ज्याप्रकारे वक्ता दशसहस्त्रेषू म्हणजेच दहा हजारात एखादा असतो तसेच उद्यमशीलता सहस्त्रेषू म्हणजेच हजारात एखादाच उद्योजक होत असल्याने उद्योजकाला संपविणे म्हणजे त्या भागातील भावी पिढीला उद्योजकतेपासून दूर करण्याचा प्रकार असल्याचे सांगून सर्व बुडीत कर्ज असलेल्या उद्योजकांना नव्याने उभारी देण्याची गरज व्यक्त केली. याप्रसंगी शेतकरी घोलप यांनीही पगारी नोकरी इन्कम टॅक्स भरणारा असल्याने मला शेती करताना असंख्य अडचणी निर्माण केल्याचे सांगून विविध योजनांपासून वंचित ठेवण्यात आल्याने शेतकरी म्हणून फार मोठे नुकसान सोसावे लागल्याची माहिती यावेळी दिली.
याप्रसंगी येत्या काही दिवसांमध्येच सर्वच राष्ट्रीयकृत बँकांकडून बुडीत कर्ज असलेल्या उद्योजकांची यादी बनवून त्यांना प्राधान्यक्रमाने पुनरूज्जीवीत करण्यासोबतच नवीन उद्योजकांनाही प्रोत्साहन देण्याची ग्वाही प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेचे डिस्ट्रिक्ट रिसोर्स पर्सन राहुल जोशी यांनी दिली. शेती व्यवसायामध्ये उतरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कृषीविषयक योजनेचा लाभ मिळण्यासाठी कृषी विभागाच्या संकेतस्थळावर अधिकाधिक नोंदणी करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी सुरज पाटील यांनी केले. यशस्वी होण्यासाठी कृषी विभागातील कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी व तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक कपिल पाटील यांनी विशेष श्रम घेतले.








Be First to Comment