शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय प्रवेशांनी : गाजलेल्या किनेश्वरपर्यंत पोहोचविणारा पुल कोसळला !
एक कोटीच्या रस्त्यामुळे तापलेले राजकारण थिजले
सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर |
तालुक्यातील आड, चांभारगणी बुद्रुक ते किनेश्वर आणि पेढावाडीपर्यंत जाणाऱ्या 1 कोटीच्या रस्त्यामुळे गेल्या दीड दोन महिन्यांपासून शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या रस्सीखेचीच्या राजकीय पक्षांतर व प्रवेशाचे खेळ संपूर्ण पोलादपूर तालुका पाहात असताना अखेर किनेश्वरपर्यंत जाणाऱ्या रस्त्यावरील एक पुल नदीपात्रामध्ये कोसळल्याने तापलेले राजकारण आता थिजले आहे.
जोरदार पावसामुळे या किनेश्वरपर्यंत जाणाऱ्या रस्त्यावरील तीन पुलांपैकी एक पुल नदीपात्रामध्ये कोसळल्याने हा रस्ता वाहतुकीस बंद झाला असून नवीन पुल उभारण्यात येईपर्यंत ग्रामस्थांना आता नदीच्या उथळ पात्रातूनच अचानक उदभवणाऱ्या पुरस्थितीचा धोका पत्करून पायवाट करावी लागणार आहे.
यंदा 22 जानेवारी रोजी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत आड ते किनेश्वर रस्त्याचे भुमिपुजन पालकमंत्री ना.अदिती तटकरे यांच्याहस्ते झाल्यानंतर या भागात राजकीय अनुकूलतेचे वारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाजूने झाले होते. यानंतर अचानक प्रत्यक्षात या कामाला सुरूवात होण्याची लक्षणे जाणवू लागल्याने गेल्या महिन्यात शिवसेनेने किनेश्वरवाडीचा पक्षप्रवेश करून घेत या गावातील पक्षाच्या फलकावर शिवसेना नाव लिहिण्याची भाषाही केली. यानंतर प्रवेशकर्ते काँग्रेस पक्षातून शिवसेनेमध्ये प्रवेश करीत असल्याचे अनेक वक्तयांच्या भाषणातून सांगण्यात आले तरीही ते सर्व प्रवेशकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून शिवसेनेमध्ये प्रवेश करणारे होते, असा खुलासा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय सलागरे यांनी वृत्तपत्रांतून केला. त्याच दिवशी पोलादपूर शहरामध्ये खासदार सुनील तटकरे यांनी किनेश्वर शिववाडीतील उरल्या सुरल्या काँग्रेसजनांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला.
कथित काँग्रेस कार्यकर्त्यांच्या प्रवेशाचे राजकारण तापले असताना आता हा किनेश्वर रस्त्यावरील पुल कोसळल्याने आड ते किनेश्वर रस्त्यासोबत सुरू झालेले शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील सामंजस्याचा पुल किती मजबूत राहिल, याचा नजिकच्या काळात प्रत्यय येण्याची शक्यता आहे.
हा पुल कोसळल्याने पोलादपूर तहसिल कार्यालयातील मंडलअधिकारी सिनकर आणि तलाठी फुलवर यांनी अहवाल तयार करून तहसिल कार्यालयाला सादर केला आहे.








Be First to Comment