Press "Enter" to skip to content

सुदर्शन केमिकल्स सन्मानित

उल्लेखनीय ‘सीएसआर’ कार्यासाठी सलग दुसऱ्यांदा सुदर्शन केमिकल्स ‘इंडिया महात्मा अवार्ड’ ने सन्मानित

सिटी बेल | रोहा – धाटाव |शशिकांत मोरे |

सुदर्शन केमिकल्स इंडस्ट्रीज लिमिटेडला अमेरिकेच्या लाईव्ह वीक ग्रुपतर्फे सामाजिक बांधिलकी उपक्रमातील (सीएसआर) उल्लेखनीय कार्यासाठी सलग दुसऱ्यांदा ‘इंडिया महात्मा अवॉर्ड्स २०२१’ने सन्मानित करण्यात आले. पुद्दुचेरीच्या उपराज्यपाल आणि माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी आणि लाईव्ह वीक ग्रुपचे अमित सचदेव यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सुदर्शन केमिकल्सच्या पिपल प्रॅक्टिस विभागाच्या प्रमुख शिवालिका पाटील आणि ‘सीएसआर’ विभागाच्या उप सरव्यवस्थापक माधुरी सणस यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

भारतातील कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचे (सीएसआर) जनक, उद्योजक आणि समाजसेवक अमित सचदेव यांनी महात्मा पुरस्कार सुरु केलेला आहे. सामाजिक शाश्वत विकासासाठी कार्यरत असलेल्या लाईव्ह वीक ग्रुप या जागतिक दर्जाच्या संस्थेमार्फत हे पुरस्कार दिले जातात. जगभरात समाजासाठी महत्वपूर्ण व भरीव कामगिरी करत असलेल्या व्यक्ती व संस्थांच्या कामाची जागतिक स्तरावर ओळख व्हावी, यासाठी हा ‘इंडिया महात्मा पुरस्कार’ दिला जातो.

यावेळी शिवालिका पाटील म्हणाल्या, “जागतिक स्तरावरील या पुरस्काराने सन्मानित होण्याचा मान सुदर्शन केमिकल्सला दुसऱ्यांदा मिळाला, याचा आनंद आणि अभिमान वाटतो. शिक्षण, पर्यावरण आणि सामाजिक विकास क्षेत्रात ‘सुदर्शन’ने भरीव काम केले आहे. वृक्षलागवड-संगोपन, कचरा व्यवस्थापन, प्रदूषण नियंत्रण यावर भर दिला आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, युवकांना प्रशिक्षण, रोजगार, सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रमासाठी बहुउद्देशीय केंद्र उभारणी, शिवणकाम प्रशिक्षण व शिलाई मशीन वाटप, कागदी पिशवी प्रकल्प राबविण्यासह बस स्टॉप, निवारा आदी सोयी उपलब्ध केल्या आहेत. कोरोनाच्या काळात सुदर्शन केमिकल्सने केलेले कार्य उल्लेखनीय होते. वैद्यकीय, जीवनावश्यक साहित्याचा पुरवठा सुदर्शन केमिकल्सने केला. शिवाय, कर्मचाऱ्यांच्या आणि रोहवासीयांच्या आरोग्यासाठी मार्गदर्शन व लसीकरण शिबिरे घेतली.

माधुरी सणस म्हणाल्या, “व्यवस्थापकीय संचालक राजेश राठी आणि शिवालिका पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुदर्शन केमिकल्सने सामाजिक बांधिलकी उपक्रमाद्वारे प्रामाणिकपणा, नैतिकता, नागरी व सामाजिक जबाबदारी या मापदंडाआधारे कार्य केले आहे. रोहा, महाड आणि मुळशीतील सुतारवाडी येथे कचरा व्यवस्थापन प्रकल्पात पाच हजार कुटुंब जोडलेली आहेत. महिला सक्षमीकरणांतर्गत आठ वर्षांपासून कागदी पिशवी बनवण्याचे काम होत असून, ३०० महिला यावर काम करीत आहेत. कागदी पिशवी बनविण्यासाठी कच्चा माल व प्रशिक्षण सुदर्शन केमिकल्स देते. २०० महिलांना शिवणकाम प्रशिक्षण दिले. अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळांना आयएसओ नामांकन, तरुणांसाठी कौशल्य विकास, आदिवासी कुटुंबाकरिता संगीत केंद्र, शेळीपालन, मत्स्यव्यवसाय उभारुण दिले आहेत. शुद्ध पाणी पुरवठा व्हावा, यासाठी गावांमध्ये एक्वा प्लांट, विहीर बांधकाम यासह गाव, शाळांमध्ये सुशोभीकरण करण्यात आले आहे.”

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.