सिटी बेल | खालापूर | मनोज कळमकर |
आपत्कालीन प्रसंगी मदतीसाठी अत्याधुनिक साधनसामग्रीची असलेली गरज ओळखून तालुक्यातील गोदरेज आणि बाॅईस मॅन्यु कारखाना व्यवस्थापनाने सामाजिक उत्तरदायित्त्व (सीएसआर) फंडातून खालापूर प्रशासनाला आपत्कालीन साहित्य भेट दिले. बुधवारी खालापूर येथील सरनौबत नेताजी पालकर सभागृहात आपत्कालीन साहित्य हस्तांतरण आणि प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी, खालापूर पोलीस ठाणे निरिक्षक अनिल विभुते, गोदरेज चे तानाजी पाटील, पोलीस उपनिरीक्षक बजरंग राजपूत, पोलीस पाटील अध्यक्ष अनंता ठोंबरे, अपघातग्रस्त मदत पथकाचे हनीफ कर्जीकर,राजेश पारठे,महिला पोलीस पाटील उपस्थित होत्या.

खालापूर तालुक्यात कारखाने, पर्यटनस्थळ, द्रुतगती मार्ग, राष्ट्रीय महामार्ग असल्याने कायम दुर्घटनेच्या छायेत तालुका असतो. शिवाय नैसर्गिक आपत्ती देखील वारंवार घडत असल्याने प्रशासनाची दमछाक होते. त्यामुळे प्रशासनाला आपत्कालीन परिस्थितीत आधुनिक मदत साहित्य मिळाल्यास अनेक जीव वाचवण्यासाठी मदत होईल या हेतूने गोदरेज आणि बाॅईस मॅन्यु ने पुढाकार घेत सीएसआर फंडातून मदत केल्याचे गोदरेज चे तानाजी पाटील यांनी सांगितले.
पोलीस प्रशासनाला चोवीस तास सावध राहावे लागत असून पावसाळ्यात अति उत्साही पर्यटकांना आवरणे कठीण होते अशा वेळी अपघात ग्रस्त मदत पथकासारख्या सामाजिक संस्था मदतीला येतात परंतु मानवी प्रयत्न तोकडे पडतात. त्यामुळे गोदरेज ने पुढाकार घेत आधुनिक आपत्कालीन दिलेले साहित्य फायदे शीर ठरणार असल्याचे पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी सांगितले. आपत्कालीन साहित्य मध्ये बोट, लाईफ जॅकेट्स, दुर्बीण, वैद्यकीय आधुनिक साहित्य देण्यात आले आहे.








Be First to Comment