कर्जत तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने कार्यकर्ता बैठकीचे आयोजन
सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |ंं
‘कर्जत तालुक्यात चारच काँग्रेसजन आहेत असे बोलले जाते. चार असले तरी चालतील,त्यांना आपल्याला सोबत घेऊन मी पुढे जात आहे. आपण कायम संघर्षमय जीवन जगलो आहोत मात्र आपल्याला कामगार संघटनेच्या माध्यमातून याची कल्पना आहे. आमच्यातील गटबाजी मधून काँग्रेस पक्ष कमी झाला हे मान्य करावे लागेल. जिल्ह्यात अडीच लाख मते आहेत हे देखील कोणी नाकारू शकत नाही. जिल्ह्यात आता मला फिरायचे आहे, त्यातून जिल्हा बांधणी सुरु आहे,त्यावेळी लगेच आपल्याला कोणालाही बदलायचे नाही, जिल्ह्यात प्रत्येकाला भेटायचे आहे,त्यातून सर्वांची मोट बांधायची असून ती मोट बांधली की काँग्रेस पक्षाची ताकद नक्कीच वाढलेली असेल. असा विश्वास रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत यांनी येथे व्यक्त केला.

कर्जत तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने कर्जत शहरातील शनी मंदिर देवस्थानच्या रविकिरण सभागृहात कार्यकर्ता बैठकीचे आयोजन केले होते. दीप प्रज्वलन करून समारंभाचे उदघाटन काँग्रेस जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महिला जिल्हा अध्यक्ष श्रद्धा ठाकूर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस नंदा म्हात्रे, जिल्हा प्रवक्ते मिलिंद पारगावकर, इंटकचे जिल्हाध्यक्ष किरीट पाटील, जिल्हा परिषद सदस्या अनसूया पादिर, माजी नगराध्यक्ष धनंजय चाचड, मनोज खेडकर,धनंजय चाचड,आदिवासी सेलचे माजी जिल्हा अध्यक्ष मनोहर पादिर,पर्यावरण सेलचे मनोहर कदम, जिल्हा चिटणीस प्रमोद राईलकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांचे स्वागत तालुका अध्यक्ष मुकेश सुर्वे आणि शहराध्यक्ष इरफान अत्तार यांनी केले. प्रास्ताविकात सुर्वे यांनी ‘तालुक्यात काम करताना सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. मी जर कमी पडलो तर मी लगेचच पदावरून बाजूला होऊन नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्याच्या खांद्याला खांदा लावून पक्ष वाढविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करीन. या कार्यक्रमात महेंद्र घरत यांचा भला मोठा तिरंगी फुलांचा पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर कोरोना योद्धा म्हणून बाळू गुरव आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच समाजातील प्रतिभावंत शूरवीर मयूर शेळके,जेष्ठ पत्रकार विजय मांडे, कलावंत प्रदीप गोगटे यांचा सन्मान चिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान करण्यात आला. कर्जत तालुक्यातील काँग्रेस पक्षातील 75 वर्षे वयोमानवरील जेष्ठ कार्यकर्ते चांद मुजावर,दीनानाथ देशमुख, भालचंद्र घुमरे, भालु केवारी, आंबो आगीवले, विठ्ठल बदे, हेमा कांबडी आदींचाही सत्कार करण्यात आला. यावेळी माथेरान इंटक अध्यक्ष म्हणून सुनील शिंदे,उपाध्यक्ष चंद्रकांत सुतार यांची निवड करण्यात आली,त्यांची नियुक्ती पत्र इंटकचे राज्य अध्यक्ष महेंद्र घरत यांनी दिले.

घरत यांनी विचार मांडताना, ‘आमचा विचार जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करताना नक्कीच करावा लागेल. जिल्ह्यात काँग्रेसचे तुकडे हे झाले आहेत,पण ते आज भाजप सारख्या पक्षात आहेत त्या सर्वांनी विचारमंथन केले पाहिजे.आता जे सरदार उभे राहिले आहेत ते सर्व काँग्रेस पक्षाचे होते,पण तो सुवर्णकाळ पुन्हा आणण्यासाठी जेष्ठाचे मार्गदर्शन घेऊन किमान रायगड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्याना चांगले दिवस आणायचे आहेत असे मत मांडून जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत यांनी कर्जत तालुका कार्यकारिणीचे कौतुक केले,
प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस नंदा म्हात्रे यांनी यावेळी बोलताना आपण दुसऱ्यांदा कर्जत तालुक्यात येत असून कर्जत तालुक्यात काँग्रेसचे कार्यकार्ये संघर्षातून पुन्हा काँग्रेस पक्ष वाढविण्याचे काम करीत आहोत.मात्र आपण संघटना म्हणून जिल्ह्यात मागे आहोत हे मान्य केले पाहिजे,त्यामुळे आपण मागे आहोत हे सांगण्याची तयारी देखील कार्यकर्त्यांची आहे.त्यातून आपल्याला जनतेच्या समस्या समजून घेता येतील आणि त्यातून मार्ग निघेल आणि आपण जनतेच्या जवळ जाऊ शकतो.त्यातून काँग्रेस पक्षाला उभारी येऊ शकते असा विश्वास नंदा म्हात्रे यांनी व्यक्त केला.

राज्य सरकार मधील आणि शासनाचे अधिकारी हे आजही आपल्याला मदत करीत नाहीत,त्यांचा आरएसएसचा बुरखा फाडला पाहिजे,त्यासाठी कार्यकर्त्यांनी संघर्ष करा असे आवाहन कार्यकर्त्यांना केले.महिला जिल्हा अध्यक्षा श्रद्धा ठाकूर यांनी यावेळी सुरुवातीला मुकेश सुर्वे यांचे कौतुक करून आजचा मेळावा बघितला की आपण पुन्हा नव्या जोमाने उभारी घेतोय असे वाटत आहे. त्यामुळे कर्जत तालुक्यातील अन्य पक्षांनी काँग्रेस पक्षाला गृहीत धरू नये असे ठणकावून सांगितले.
माथेरानचे माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांनी यावेळी बोलताना माथेरान हे लहान असले तरी माथेरान हे नावाला मोठे वलय आहे.त्यामुळे माथेरान मधील समस्या समजून घेऊन राज्य सरकारच्या माध्यमातून सोडवता येतील.’ अशी माहिती आपल्या भाषणात दिली. सूत्रसंचालन राजेंद्र भगत यांनी तर आभार प्रदर्शन धंनजय चाचड यांनी केले. याप्रसंगी काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.








Be First to Comment