सिटी बेल | पेण | वार्ताहर |
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण सर्वोच्च न्यायालय दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण तसेच उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशानुसार संपूर्ण भारतभर २ आॅक्टोंबर ते १४ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत न्याय विधी सेवा जागरुकता अभियान व पोहोच अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
त्या अनुषंगाने आज पेण मध्येही तालुका विधीसेवा समिती व वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने या अभियानाची सुरुवात पेण न्यायालयात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पेणच्या न्यायाधीश श्रिमती आर.एन.मुजावर यांनी अभिवादन करून करण्यात आली.
यावेळी बोलतांना श्रिमती आर.एन.मुजावर म्हणाल्या की, सदरच्या अभियानात स्थानिक न्यायालय व गावपातळीवरील उपक्रमात जेष्ठ नागरिक, महिला, युवक युवती यासह अनेक उपयुक्त कायदे आणि आरोग्य विषयी माहिती या कालावधीत दिली जाणार असून याची सुरुवात रॅलीच्या माध्यमातून पेण शहरात जनजागृतीद्वारे करण्यात आली यावेळी तालुक्यातील वाकरुळ ग्रामपंचायत हद्दीतील शासकीय आश्रमशाळा वरवणे येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे. तसेच या दिड महिन्यात अभियानांतर्गत वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येणार असून आताच न्यायालयाच्या माध्यमातून लोक आदालत मध्ये तालुक्यातील अनेक वादविवाद मिटविण्यात आले आहेत असेही त्यांनी सांगून या अभियानामध्ये पेण येथील लायन्स क्लब, वरवणे शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी, तालुका न्यायालयातील वकील, पोलिस यासह इतर कर्मचारी वर्ग या सर्वांचा सहभाग असल्याचे न्यायाधीश श्रिमती मुजावर यांनी सांगितले.
यावेळी सरकारी वकील एस.वाय.नाईक, पोलिस निरीक्षक देवेंद्र पोळ, महिला पोलिस उपनिरीक्षक घाडगे, पेेेण वकिल बार अध्यक्ष नंदू म्हात्रे आदिंसह वकिल, पोलिस, न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.








Be First to Comment