मंदीतही संधी करण्याची किमया जोगेश्वरी पतसंस्थेने साधली : किशोरभाई जैन यांचे गौरोद्गार
सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |
कोरोना काळात सर्वचजण मंदी असल्याची ओरड करत असतांनाच नागोठण्याची ग्रामदेवता श्री जोगेश्वरी मातेच्या नावाने असलेली सर्वसामान्यांची ही पतसंस्था कुठेच कमी न पडता जनतेच्या सेवेसाठी तत्पर होती. कोरोनाच्या काळात आमच्या ठेवीदारांना वेळोवेळी पैसे दिले. अडचणीत सापडलेल्यांना सहकार्य केले. तसेच कर्जदारांशी नम्रपणे वागल्यानेच जोगेश्वरी पतसंस्थेवरील सर्वांचा विश्वास व जिव्हाळा वाढला. पतसंस्थेचे प्रामाणिक व मेहनती संचालक मंडळ, कर्मचारी वर्ग, सभासद, ठेवीदार तसेच चांगले कर्जदार यांच्यामुळे हे शक्य झाल्याने आम्ही मंदीतही संधी करण्याची किमया साधली असे गौरोद्गार पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष किशोरभाई जैन यांनी काढले. तसेच कोरोना काळातही पतसंस्थेचा भरभराटीचा अहवाल सादर करताना मला गर्व होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात नावाजलेल्या अशा श्री जोगेश्वरी मर्चंट सहकारी पतसंस्थेची २२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी सायंकाळी ५ वाजता नागोठणे ग्रामपंचायतीच्या गणेश सभागृहात ऑनलाईन घेण्यात आली त्यावेळी सभासदांना मार्गदर्शन करताना किशोरभाई जैन बोलत होते. यावेळी पतसंस्थेचे तज्ञ सचिव संजय काकडे, अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले खजिनदार दिनेश परमार, संचालक तसेच नागोठणे सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, संचालक रितेश दोशी, शैलेश रावकर, राजकुमार पितानी, संचालिका सौ. दीपिका दिपक गायकवाड, सौ. विजया दिनेश परमार, सौ. कल्पना राजीव टेमकर, व्यवस्थापक सुनिल नावले यांच्यासह रोहा पं. स. सदस्य संजय भोसले, सुधागड पं. स. सभापती नंदू सुतार, नागोठणे उपसरपंच मोहन नागोठणेकर आदींसह निवडक सभासद उपस्थित होते.
संस्थेच्या वार्षिक अहवाल व ताळेबंद वाचन करताना सचिव संजय काकडे म्हणाले की, किशोरभाई जैन यांच्या प्रामाणिक नेतृत्वामुळे पतसंस्थेच्या सभासदांनी आमच्यावर ठेवलेला विश्वास आम्ही सार्थ करू शकलो. आम्ही पारदर्शक व्यवहार केल्यामुळे आमच्या पतसंस्थेच्या ठेवी १० कोटी रुपये असून ४ कोटी ८८ लाख ठेवी आम्ही इतर बँकेत ठेवलेल्या आहेत अशी माहिती काकडे यांनी यावेळी दिली. दरम्यान पतसंस्थेच्या सभेचे सूत्रसंचालन व नफातोटा पत्रक वाचन दिनेश परमार, इतिवृत्त वाचन व्यवस्थापक सुनिल नावले तसेच अंदाजपत्रक संचालिका दिपीका गायकवाड यांनी केले.
किशोरभाई जैन पुढे म्हणाले की, मी राजकारणात असलो तरी, कर्ज देतांना मी माझे राजकीय वलय बाजूला ठेवतो. तसेच नफा कमविण्यापेक्षा पारदर्शकतेवर भर देत असल्यानेच कर्ज देत असताना संचालक मंडळ काटेकोर पद्धतीने लक्ष देत असते. म्हणून जोगेश्वरी पतसंस्थेस गेले अनेक वर्ष ‘ अ ‘ वर्ग मिळत आहे. आजतागायत माझ्या कुठल्याही निर्णयाला संचालक मंडळ साथ देत आलेली आहे याचा मला सार्थ अभिमान असून असेच सहकार्य संचालक मंडळ व सभासदांनी करावे असे आवाहन केले. दरम्यान किशोरभाई जैन यांनी यावेळी सभासदांना ८ टक्के लाभांश जाहीर केला.
१० लाख रुपये गृहकर्ज देण्याचा पतसंस्थेचा निर्णय
संस्थेकडून गृह कर्जासाठी १० वर्षाच्या मुदतीमध्ये १० लाख रुपये देणार असल्याचा ठराव आज सर्व संचालक मंडळाच्या वतीने मान्य झाला असल्याचे यावेळी किशोरभाई जैन यांनी जाहीर केले. तसेच
अडचणीत असलेली व्यक्ती बाहेरच्या बँकेकडून कोणताही विचार न करता सोने तारण कर्ज घेत असते. ती बँक त्या व्यक्तीचा गैफायदा घेते हे लक्षात ठेऊन नागोठणेकरांसाठी जोगेश्वरी पतसंस्था गोपनीयता बाळगून अत्यंत माफक म्हणजे फक्त १२ % व्याजदर घेऊन सोने तारण कर्ज देणार आहे. या योजनांमुळे सभासद व बँकेच्या ग्राहकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहेत.








Be First to Comment