Press "Enter" to skip to content

लाचखोर उपनिबंधकाच्या प्रकरणानंतर सभासद कामगारांतून उलट-सुलट चर्चा

जॉन्सन सेवक सहकारी पतसंस्थेच्या निकालपत्राची प्रत देण्यास उपजिल्हा निबंधक कार्यालयाची टाळाटाळ

सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |

अष्टमी (रोहा) येथील एका सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापनेच्या प्रलंबित प्रकरणाचा निकाल देण्यासाठी ४० हजारांची लाच स्वीकारतांना जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक गोपाल मावळे व कार्यालयातील मुख्य लिपिक सुहास दवटे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नुकतेच रंगेहाथ पकडले. या प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या अलिबाग येथील सहकारी संस्था उपजिल्हा निबंधक कार्यालयाचा आणखी एक प्रताप उघड झाला असून गडब (ता.पेण) येथील एच. अँड आर. जॉन्सन सेवक सहकारी पतसंस्थेच्या निकालपत्राची प्रत देण्यास उपजिल्हा निबंधक कार्यालयाची टाळाटाळ सुरु असल्याने सभासद कामगार वर्गातून तीव्र संतापासह उलट-सुलट चर्चा सुरु आहे. तसेच भ्रष्ट्राचारी अधिकाऱ्यांमुळे आपल्या या प्रकरणाचे निकालपत्र काय असेल अशी शंका आता कामगारांतून व्यक्त करण्यात येत आहे.

उपलब्ध माहितीनुसार गेल्या वर्षी सप्टेंबर, २०२० मध्ये गडाब येथील जॉन्सन टाईल्स कंपनीने ६७ कायम कामगारांना नोकरीतून कमी केल्यानंतर त्याचा आधार घेऊन कंपनीने एच. अँड आर. जॉन्सन सेवक सहकारी पतसंस्थेचे सभासद असलेल्या या कामगारांचे पतसंस्था सभासदत्वही बेकायदेशीरपणे रद्द केले होते. त्यानंतर याप्रकरणी बहुतांश कामगारांनी पेण येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात याप्रकरणी दाद मागितली होती. तेथे सभासद कामगारांना न्याय न मिळाल्याने संबधित सर्व सभासद कामगारांनी अलिबाग येथील उपजिल्हा निबंधक कार्यालयात सहाय्यक निबंधकांच्या निकालाविरोधात आव्हान दिले होते. उपजिल्हा निबंधक कार्यालयात सभासद कामगारांच्या वतीने पेण येथील जगन्नाथ म्हात्रे उर्फ नाथाभाऊ यांनी महाराष्ट्र सहकारी अधिनियम १९६० अन्वये सभासद कामगारांची बाजू योग्य पद्धतीने व ठामपणे मांडली होती. याप्रकरणी १२ जुलै, २०२१ रोजी अंतिम सुनावणी घेण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसांनी याप्रकरणी निकालही देण्यात आला होता.

या प्रकरणाचा निकाल जाहीर झाल्याचे समजताच काही कामगारांनी उपजिल्हा निबंधक कार्यालयात जाऊन निकालपत्राची मागणी केली असता सदर निकालपत्र पोस्टाने एक तक्रारदार सभासद कामगार प्रेमनाथ पाटील यांना पाठविल्याचे सांगण्यात आले. मात्र याला १० ते १५ दिवस उलटूनही हे निकालपत्र आपल्याला मिळाले नसल्याचे प्रेमनाथ पाटील सांगत आहेत. त्यामुळे या निकालपत्रात नक्की काय आहे हे सभासद कामगारांना अद्याप समजले नाही. त्यामुळे उपजिल्हा निबंधक कार्यालयात निकालपत्राचे नक्की काय करण्यात आले आहे, निकालपत्र अद्याप का पाठविण्यात आले नाही व निकालपत्रात नक्की आहे तरी काय हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

याप्रकरणी उपजिल्हा निबंधक कार्यालयात संपर्क साधला असता नुकत्याच झालेल्या प्रकरणामुळे सध्या कार्यालयात वेगळेच वातावरण असून लवकरच याप्रकरणी माहिती घेऊन हे निकालपत्र देण्यात येईल असे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. तर निकालपत्रात काय आहे हे अद्याप आपल्याला बघायला मिळाले नसल्याने निकालपत्र पाहून पुढील दिशा ठरविण्यात येईल असे याप्रकरणी कामगारांची बाजू मांडणारे नाथाभाऊ यांनी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.