Press "Enter" to skip to content

रायगड मधील पाॅवरफुल शिवसेना नेत्यांचे काँग्रेस जिल्हा अध्यक्षांच्या निवासस्थानी स्नेहभोजन

तटकरेंच्या “युज अँड फरगेट” पॉलिसीला शह देण्यासाठी शिवसेना – काॅंग्रेसची मोर्चेबांधणी : ३ महेंद्रांची वज्रमुठ

सिटी बेल | उलवे – शेलघर |

रायगड जिल्ह्यातील पाॅवरफुल शिवसेना नेते आमदार महेंद्र थोरवे, आमदार महेंद्र दळवी, माजी आमदार मनोहरशेठ भोईर, शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील आदी नेत्यांसाठी बुधवारी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष तथा इंटक चे राष्ट्रीय सचिव महेंद्रशेठ घरत यांच्या शेलघर येथील सुखकर्ता या निवास्थानी स्नेहभोजन आयोजित केले होते.

आगामी काळात रायगड जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत त्यात महानगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायत यांचा समावेश आहे.सध्या रायगड जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्वाची मानली जाते.

अलीकडेच शिवसेना नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते यांनी राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्यावर जाहीर सभेत जोरदार आगपाखड केली होती. त्यातच काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत यांनी जिल्ह्याची सुत्रे आपल्या हाती घेतल्या नंतर जिल्ह्यात काँग्रेसचा झंझावात पाहायला मिळत आहे. त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांचे नाव न घेता केलेली टीका हि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या चांगलीच जिव्हारी लागलेली पाहायला मिळत आहे. त्यांच्या टिकेनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतलेली पत्रकार परिषद व त्यांनी अनंत गिते साहेब व महेंद्र घरत यांच्यावर अत्यंत खालच्या स्तरावर केलेली टीका हि शिवसेना आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना आवडले नसल्याने,रायगड जिल्ह्यात आता नवीन राजकीय समीकरणे पाहायला मिळतात का ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. अश्यातच काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या घरी झालेला शिवसेना नेत्यांचा स्नेहभोजन कार्यक्रम चर्चेचा विषय बनला आहे.

सुनील तटकरे यांचा राजकीय पक्षांना “युज अँड फरगेट” करण्याचा फॉर्म्युला एव्हाना महाविकास आघाडी मधील सर्वच पक्षांना झटका देऊन गेला आहे.आघाडी धर्म निभावणाऱ्या काँग्रेस,शिवसेना आणि शेकाप नेत्यांना तटकरे फॉर्म्युला चांगलाच अवगत झाला आहे.जे मिळेल ते आपल्याच कुटुंबात ठेवणाऱ्या तटकरे यांनी कार्यकर्त्यांना आणि आघाडी मधल्या घटक पक्षांना बळ देण्याचे काम अभावानेच केले आहे.गरज असेल तर विरोधक असणाऱ्या भाजपा चा देखील त्यांनी युज अँड फरगेट फॉर्म्युला वापरून आमदारकीची माळ कुटुंबातील सदस्याच्या गळ्यात टाकली आहे. त्यामुळे सुखकर्ता वरील स्नेहभोजनात तटकरे यांच्या विरोधातील चर्चा पटलावर आलीच असणार असे राजकीय तज्ञांचे कयास आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.