Press "Enter" to skip to content

परतीच्या पावसाने हळवी भातशेती धोक्यात

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |

गेली आठ दिवस अधून मधून कोसळत असलेल्या परतीच्या पावसाचा सर्वात मोठा फटका भातशेतीला बसत असल्याने हळवी भातशेती धोक्यात येऊन शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.

आपला भारत देश मोसमी हवामानाचा देश असल्याने बहुतांश जनजीवन हे शेतीवरच अवलंबून आहे.शेती हेच मुख्य रोजगाराचे साधन असल्याने आपली अर्थव्यवस्थाही क्रुषीक्षेत्राशी निगडीत आहे.परंतू दरवर्षी मोसमी हवामानाचा फटका शेती क्षेत्राला बसत असल्याने उत्पादनात तर घट होतच आहे. याशिवाय शेतकरी वर्गाच्या उदरनिर्वाहासह रोजगाराचीही समस्या निर्माण होऊ लागली आहे. तर गेल्या आठ दिवसापासून दिवसभरात अधून मधून कोसळत असलेल्या पावसामुळे तसेच वाहणाऱ्या वा-यामुळे भातशेती आडवी होऊन नुकसानही झाले आहे.

हळवी भातशेती तयार होऊन व भाताचे कणिसही चांगले भरल्याने व त्याचा भार भर पावसात सोसत नसल्याने काही ठिकाणी भाताची तयार कणसे जमीनदोस्त झाली असल्याचे दिसून येत आहेत.यावर्षीच्या पावसाळी हंगामात सुरूवातीपासून भातशेतीला लायक पाऊस पडल्याने भाताचे सर्वच वाण चांगलेच टवकारले व भातशेतीलाही चांगलाच बहर आला असल्याचे पहावयास मिळाले.

एकंदरीत भातशेती चांगली टवकारल्याने शेतकरीवर्गही सुखावला असतानाच गेल्या आठ दिवसांपासून परतीचा पाऊस सक्रीय होऊन कोसळू लागल्याने शेती क्षेत्राचे फार मोठे नुकसान होऊ लागले आहे. हीच परिस्थिती आणखी काही दिवस राहिली तर शेतकरी वर्गासमोर फार मोठे आर्थिक संकट निर्माण होऊन उपजिविकेचाही प्रश्न सतावणार असल्याची भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होऊ लागली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.