Press "Enter" to skip to content

वातावरणातील बदल व वायू प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्य समस्यांमध्ये वाढ !!

हृदयविकार असलेल्या नागरिकांसाठी सध्याचे वातावरण दूषित

सिटी बेल | आरोग्य प्रतिनिधी |

राज्यामध्ये मुंबई, नवी मुंबई -ठाणे येथे फक्त सकाळच्या वेळी पाऊस जोरदार पडत असून दुपारी अचानक वातावरणात बदल होऊन उकाडा होण्यास सुरुवात होते. सकाळी गारवा व दुपारी उकाडा अशा विचित्र वातावरणामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य बिघडत असल्याची माहिती आरोग्यक्षेत्रामधून पुढे आली आहे.

गुलाब चक्रीवादळामुळे सध्या पाऊसाचा जोर वाढला असला तरी पाऊस थांबल्यावर शहंसरातील नागरिक घामाघूम होत आहे. यातच रेल्वेने प्रवास करण्यावर बंधन असल्यामुळे शहरातील वाहतूककोंडी वाढत आहे त्यामुळे हवेमध्ये प्रदूषण वाढत आहे. ढगाळ वातावरणामुळे वाहनातून तसेच कारखान्यातून निघत असलेला धूर उंच जात नाही व तो जमीनीपासून ३० ते ४० फूट उंचीपर्यंत रेंगाळत राहतो व या धुरामुळे नागरिकांना आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

या काळात वाढलेल्या व्याधीविषयी माहिती देताना कल्याण येथील याविषयी अधिक माहिती देताना साई स्वस्तिक हॉस्पिटलचे संचालक व वैद्यकीय चिकित्सक डॉ. तुषार ठेंगने सांगतात , ” वातावरणात असलेल्या सकाळचा गारवा व दुपारनंतर होणाऱ्या गर्मीमुळे हे वातावरण खास करून जेष्ठ नागरिक, गर्भवती महिला व लहान मुलांमध्ये आजार बळावण्याचे प्रमुख्य कारण आहे.

सकाळी हवेचे कमी झालेले तापमान आणि प्रदूषण यामुळे श्वसनमार्गाची प्रतिकार शक्ती कमी होऊन जंतुसंसर्ग झपाटय़ाने होण्यास मदत होते. फुफ्फुसांना सूज येवून त्या भागामध्ये कफ जमा होतो. स्पंज सारखा नरम असणारा फुफ्फुसाचा बाधित हिस्सा घट्ट बनतो आणि तो श्वसनक्रियेत भाग घेऊ शकत नाही. त्यामुळे रुग्णाला खोकला, ताप येऊ लागतो. याशिवाय थंड हवा आणि हवेच्या खालच्या थरामध्ये स्थिर झालेले प्रदूषण यामुळे डोळ्यांची जळजळ होणे, गुदमरल्यासारखे वाटणे, नाक व घसा जळजळणे, शिंका येणे, खोकला, घसा खवखवणे यामुळे अनेक नागरिक त्रस्त आहेत.

संसर्गजन्य आजार टाळण्यासाठी रस्त्यावरील सिग्नल व चौक, तसेच वाहतूक कोंडी अशा ठिकाणी कमीत कमी वेळ थांबावे. थांबणे गरजेचे असेल तर तोंडावर आणि नाकावर रुमाल किंवा मास्क लावावा. खोकताना अथवा शिंकताना नाका तोंडावर रुमाल किंवा कपडा धरावा. यामुळे आसपासच्या व्यक्तींना होणारा संसर्ग काही प्रमाणात कमी होऊ शकतो.”
द लँसेट जर्नल’मध्ये २०१७ मध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, भारतातील दर आठ मृत्यूंमागे एक मृत्यू वायू प्रदूषणामुळे होत आहे.

या वर्षातील सुमारे १२.४ लाख मृत्यू वायू प्रदूषणामुळे झाल्याचे हे संशोधन सांगते.भारतातील वायू प्रदूषण मर्यादेबाहेर गेले नसते, तर देशातील सरासरी आयुर्मान १.७ वर्षाने वाढले असते, असेही त्यात म्हटले आहे.हवेतील सूक्ष्म धुलीकणांचे प्रमाण विशिष्ट मर्यादेपर्यंत घटविल्यास वायू प्रदूषणामुळे होणारे मृत्यू १५ टक्क्यांनी कमी होतील, असे ‘डब्ल्यूएचओ’ने म्हटले आहे.

प्रदूषित वातावरणात वास्तव्य असलेल्या लोकांना तुलनात्मकदृष्टय़ा हृदयविकाराचे वारंवार झटके येत राहतात. या अशुद्ध हवेने तसेच धूम्रपानातील धुराने रोहिणी या शुद्ध रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्यांना स्लेरोसिसची व्याधी जडतात व त्या सुजतात. त्यातून हृदयाच्या विकारांना प्रारंभ होतो अशी महत्वाची माहिती साई स्वस्तिक हॉस्पिटलचे संचालक व वैद्यकीय चिकित्सक डॉ. तुषार ठेंगने यांनी दिली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.