Press "Enter" to skip to content

सुधागड तालुक्यातील रस्त्यांना नाही कोणी वाली : महामार्गाची दुरवस्था

अष्टविनायकाच्या पालीत खड्यांचे विघ्न : खराब रस्त्यांमुळे नागरिक व वाहनचालक मेटाकुटीला

सिटी बेल | रायगड | धम्मशील सावंत |   

रायगड जिल्ह्यातील सुधागड हा तालुका आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यात जवळपास 100 महसुली गावे आहेत. तसेच साडे तीनशे पेक्षा अधिक आदिवासी व ठाकुरवाड्या असून त्या दुर्गम भागात तसेच डोंगरावर वसलेल्या आहेत. येथील रस्ते खस्ते खात आहेत, रस्त्यांची अवस्था दयनीय आहे.

यातील काही गावे व वाड्यांपर्यंत कच्चा रस्ता किंवा पायवाटच जाते तीही स्थानिकांनीच तयार केलेली आहे.  काही गावांना अजून पर्यंत साधे कच्चे रस्ते देखील नाही आहेत.  तर अनेक गावे, वाड्यांपर्यंत कच्चे रस्ते किंवा खडी व मातीचा भराव असलेले रस्ते आहेत. काही रस्त्यांवर अस्ताव्यस्त पडलेले दगड व खडी आणि खड्डे आहेत. वर्षानुवर्षे रस्त्यांची साधी डागडुजी देखील झालेली नाही.

स्थानीक प्रशासनाला व लोक प्रतिनिधींना या भयानक वास्तव्याची जाणीव असून देखील याबाबत त्यांच्याकडून काहीही उपाय किंवा तजवीज होतांना दिसत नाही. बऱ्याच ठिकाणी तर राजकारणी रस्त्याचे राजकारण करतात. मात्र निवडणूका झाल्यानंतर कोणीही तिकडे फिरकून पाहत नाही. अशी येथील लोकांची खंत आहे.

सुधागड तालुक्यातील सिध्देश्वर (खुर्द), कळंब, चेरफळवाडी, शिरसेवाडी, करंजाई यासह अनेक ठाकूरवाड्या, तसेच मढाळी, शिळोशी, पावसाळावाडी, दांड, गाठेमाळ, मुळशी, डुबेवाडी, दर्यागाव, चिवे, ढोकळेवाडी असे बहुसंख्य आदिवासी व कातकर वाड्या, कणी, गौळमाळ, गोगुळवाडा, गोकुळवाडा, कोंडी असे कित्येक धनगरवाडे सोबत गोमाशी, दिघेवाडी, खांडसई, घोटवडे, शिळोशी, मढाळी, कामथेकरवाडी, आसरे, नवघर, धोंडसे, वाघोशी, वांद्रोशी, पाच्छापूर, कोंडगाव, फणसवाडी, कोशिंबळे आदी असंख्य गावांना जाणाऱ्या मार्गाची देखील पुरती दुरवस्था झाली आहे.

येथील रस्त्यांवर अक्षरशः मोठाले खड्डे पडले आहेत. खडी आणि माती बाहेर आली आहे. तर काही रस्त्यांची कित्येक वर्षे साधी दुरुस्ती देखील झालेली नाही. असा खडतर आणि खाचखळग्यांच्या रस्त्यावरून नागरिक, वृद्ध, विद्यार्थी, रुग्ण व महिला प्रवास करतात. कधीतरी लोकप्रतिनिधी किंवा शासनाला जाग येऊन ते रस्ता करतील किंवा डागडुजी करतील या भोळ्या आशेवर येथील लोक जगत आहेत.

खराब रस्त्यामुळे हाल

पालीसह तालुक्यात खराब रस्त्यामुळे महिला, रुग्ण आणि वृद्धांची मोठी गैरसोय होते. शाळकरी मुले रोज या खडतर रस्त्यावरून पायपीट करत आपली शाळा गाठतात. त्यांचे देखील खूप हाल होतात. घरगुती सामान देखील अनेकांना पाठीवर वाहून आणावे लागते. साधी दुचाकी जातांना सुद्धा जातांना खूप अवघड जाते. रस्त्यांची दुरवस्था झाल्याने तेथील ग्रामस्थांचे तसेच वृद्ध, महिला आणि रुग्णांचे तर रस्त्याभावी खूप हाल होतात. रुग्ण आणि गर्भवती महिलांना तर झोळीतूनच आणावे लागते. त्यामुळेच हे मार्ग लवकर बनविण्यात यावेत अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. या सर्व ठिकाणी एखादे वाहन जाईल असा रस्ता झाल्यास या सर्वांची वर्षानुवर्षे होणारी परवड थांबेल.
अष्टविनायकाच्या पालीत खड्ड्यांचे विघ्न 

अष्टविनायकाचे स्थान असलेल्या बल्लाळेश्वराच्या पालीत अंतर्गत रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले अाहे. येथील  रस्ते ठिकठिकाणी फुटले आहेत. अनेक ठिकाणी मोठाले खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमूळे नागरिकांसह बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी येणारे भाविक आणि वाहनचालकांची खूप गैरसोय होते. अवजड वाहनांची वाहतूक, निकृष्ठ दर्जाचे रस्ते आणि देखभालीचा अभाव अशा अनेक कारणांमुळे पालीतील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पालीतील सावंतअाळी, राम आळी व मधल्या अाळी पासून बल्लाळेश्वर मंदिरापर्यंतच्या रस्त्याची चाळण झाली आहे. तसेच मिनिडोअर स्थानक, भोई अाळी, बसस्थानक रस्ता देखिल खराब झाला आहे. ग. बा. वडेर हायस्कुल, बुरुड आळी व बस स्थानका जवळील मार्गावर मोठे खड्डे पडले आहेत. त्याचबरोबर बल्लाळेश्वर नगर, धुंडीविनायक नगर व शिळोशी अाणि मढाळी गावाकडे जाणारा रस्ता देखिल फुटला आहे. त्यातून मोठे दगड बाहेर आले आहेत. 

पालीत कित्येक ठिकाणी नवीन नळ वाहिन्या टाकण्यासाठी किंवा दुरीस्तीसाठी रस्ते खोदले अाहेत. मात्र नळवाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण झाल्यावर हे खड्डे सिमेंट किंवा डांबराने नीट बुजविले जात नाहीत आणि तेथे पुन्हा खड्डे पडतात. तसेच ग्रामपंचायती मार्फत देखिल नळवाहिन्याची दुरुस्ती करतांना मोठ्या प्रमाणात खड्डे खोदले जातात. तसेच नळवाहिन्यांना गळती लागून पाणी रस्त्यावर अाल्यानंतर वाहने जावून तेथील रस्त्यावर खड्डे पडतात. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.