Press "Enter" to skip to content

उरण येथे लोकन्यायालयात ११६ प्रकरणे निकालात

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |

उरण न्यायालयातील दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर उरण न्यायाधीश निलेश एम. वाली, सह दिवाणी कनिष्ठ स्तर उरण राहुल बी. पोळ, २ रे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर उरण प्रियांका एन. पठाडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकन्यायालयातील ११६ प्रकरणे सामंजस्याने निकालात काढण्यात आली.

लोकन्यायालय म्हणजे वाद उदभवला तर शक्यतो तो सामंजस्यपणे सोडवावा ही आपली प्राचीन परंपरा होती. गावातील जुनेजाणती माणसे एकत्र येऊन कुठलाही वाद समजुतीने मिटवित असत. हा वाद ते निःपक्षपातीपणे सोडावीत असत. यालाच गाव पंचायत म्हणत. सध्याचे लोकन्यायालय म्हणजेच गाव पंचायतीचे आधुनिक रूप होय. या लोकन्यायालयात कायदा जाणणारे निःपक्षपाती लोकांचे न्यायमंडळ यांच्यापुढे येणारे प्रकरण समजुतीने न्याय तडजोडी घडवून मिटविले जातात.

सदर लोकन्यालये राज्यातील सर्व न्यायालयात नियमितपणे भरविली जातात.प्रत्येक जिल्ह्याच्या व तालुक्याच्या ठिकाणी दोन महिन्यातून किमान एकदा व आवश्यकता भासल्यास त्याहून अधिक वेळा योग्य त्या सूचना देऊन त्या-त्या न्यायालयामध्ये लोकन्यायालयाचे आयोजन केले जाते. अशाच प्रकारचे लोकन्यायालयाचे आयोजन उरण न्यायालयात करण्यात आले होते
यामध्ये जमिनीचे वाद, कौटुंबिक वाद, वाहतुकीचे नियम मोडणारे अशा अनेक प्रकारच्या खतल्यावर सामंजस्यपणाने न्यायनिवाडा करण्यात आला. अशा प्रकारे लोकन्यायालयात एकूण ११६ प्रकरणे निकालात काढण्यात आली.

लोकन्यायालयाच्या आयोजनाबद्दल जनतेकडून समाधान व्यक्त केले जात आहे. तसेच वेळेची व खर्चाचीही बचत होत आहे. अशा प्रकारे खटले निकाली निघाले तर नक्कीच आपापसातील हेवेदावे संपुष्टात येतील अशी चर्चा न्यायालयात उपस्थित असलेल्या जनतेत सुरू होती. यावेळी उरण संघटनेच्या सर्व वकिलांनी सहकार्य केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.