सिटी बेल | माथेरान | मुकुंद रांजाणे |
अन्य पर्यटनस्थळाच्या तुलनेत माथेरान हे सुंदर गाव अनेक वर्षांपासून विकासापासून खूपच पिछाडीवर होते. परंतु २०१३ साली एमएमआरडीए ने माथेरान मधील प्रलंबित असणाऱ्या विकास कामांसाठी भरीव निधी उपलब्ध करून दिल्यामुळेच मागील दोन वर्षांपासून इथे युद्धपातळीवर कामे सुरू आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने माथेरानची एकप्रकारे नवीन ओळख निर्माण होत आहे. याकामी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत आणि नगरपरिषदेचे गटनेते प्रसाद सावंत यांनी आपल्या शिष्टमंडळासह मुंबई येथील एमएमआरडीए कार्यालयात जाऊन संबंधीत अधिकारी वर्गाची सदिच्छा भेट घेतली.
त्यांनी माथेरान प्रती जी काही विकास कामे मार्गी लावण्यासाठी सकारात्मकता दाखविलेली आहे आणि त्यांचे वेळोवेळी उत्तम प्रकारे मार्गदर्शन लाभल्यामुळे कामे प्रगतीपथावर पूर्णत्वास गेली आहेत.यावेळी एमएमआरडीए चे आयुक्त श्रीनिवास, अतिरिक्त आयुक्त डॉ. गोविंद राज,
कार्यकारी अभियंता अरविंद धाबे यांना सन्मानचिन्ह देऊन त्यांचा नगराध्यक्षा प्रेरणा सावंत आणि गटनेते तथा बांधकाम सभापती प्रसाद सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

एमएमआरडीए च्या या सर्व संबंधित अधिकारी वर्गाच्या दांडग्या अनुभवातुन आणि सकारात्मक प्रतिसाद देत उत्तम प्रकारे मार्गदर्शन केल्यामुळे दस्तुरी नाक्यावर सुसज्ज वाहन पार्किंग सुविधा त्याचप्रमाणे हार्ट पॉईंट आणि मायरा पॉईंटला नवसंजीवनी प्राप्त झाली आहे. यापुढेही एमएमआरडीए च्या माध्यमातून या गावाला भरीव निधी उपलब्ध करुन या गावाचा सर्वतोपरी कायापालट करावा जेणेकरून इथे पर्यटकांची संख्या अधिकाधिक वाढून सर्वसामान्य लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल असे प्रसाद सावंत यांनी स्पष्ट केले.







Be First to Comment