कोंकण ज्ञानपीठ राहुल धारकर फार्मसी महाविद्यालया मध्ये फार्मासिस्ट डे चे आयोजन
सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
कोरोना महामारीचे संकट आल्यानंतर प्रत्येक जण आपल्या जिवाच्या भीतीने घरातच होता मात्र फार्मासिस्ट चोवीस तास आपले काम जिवावर उदार होऊन करीत होते. असे असताना ते दुर्लक्षित होते. त्यांचे साधे लसीकरण करतानाही आम्हाला थोडा संघर्ष करावा लागला. खरे तर कोरोना काळातील कोरोना योद्धा फार्मासिस्ट आहेत आणि एरव्ही ते देवदूत म्हणून काम करून अनेक अशिक्षित रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांचे ते तारणहार ठरले आहेत. या क्षेत्रात नव्याने येणाऱ्यानी सर्वप्रथम विश्वास संपादन केला पाहिजे.’ असे महत्वपूर्ण प्रतिपादन कोंकण ज्ञानपीठ राहुल धारकर फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन काळे यांनी केले.
कोंकण ज्ञानपीठ राहुल धारकर फार्मसी महाविद्यालया मध्ये फार्मासिस्ट डे चे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य विजय मांडे व्यासपीठावर उपस्थित होते. प्रा. इनिया कुमार यांनी प्रास्ताविक केले. फार्मसी डिप्लोमा प्रमुख डॉ. वैशाली जाधव याप्रसंगी राष्ट्रीय शिक्षण उत्कृष्टता पुरस्कार आणि परिषद 2021 यांनी ‘अग्रणी आणि उत्कृष्ट फार्मसी कॉलेज ऑफ द इयर 2021 महाराष्ट्र’ हा पुरस्कार तर बिगिन अप रिसर्च इंटेलिजन्स प्रायव्हेट लिमिटेड बेंगळुरू यांनी ‘गुणवत्ता शिक्षण, उत्कृष्ट प्रशासन आणि सामाजिक योगदान’ हा पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. मोहन काळे यांचा सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन विजय मांडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रथम वर्ष व द्वितीय वर्षात विशेष नैपुण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच रायगड महिला क्रिकेट मध्ये गोलंदाज म्हणून निवड झालेल्या कु. श्रुती अदीत हीच विशेष सन्मान करण्यात आला. कोरोना काळात मुंबईतील नायर रुग्णालयात काम केलेल्या कु. शैला यादव या विद्यार्थिनीने आपले अनुभव कथन केल्याने उपस्थितांची वाहवा मिळविली. डॉ. वैशाली जाधव यांनी ‘विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणावर विशेष लक्ष देऊन आपण करीत असलेल्या कामाने समाजाला कशी मदत होईल हे पहावे. नुसतीच पदवी घेऊन बसण्यापेक्षा याच विषयातील वेगवेगळ्या विभागाची माहिती अभ्यासावी.’ असे सूचित केले. मांडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचलन प्रा. श्वेता गायकवाड तर आभार प्रदर्शन प्रा. दिशा भिलावे यांनी केले. याप्रसंगी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.







Be First to Comment