सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
मोहोपाडा आळी आंबिवली येथील भालचंद्र हरिभाऊ जाधव (वय 40)याचा विजपोळावरुन पडून मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांना विजमंडळाकडून पाच लाख रोख रक्कम आर्थिक मदत म्हणून गुरुवार दि.23 सप्टेंबर रोजी सायंकाळी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत देण्यात आली.
विजमंडळाचे कंत्राटी कामगार भालचंद्र जाधव हा मोहोपाडा बाजारपेठ रस्त्यावरील गणेश गीध यांच्या दुकानासमोरील विजपोळावरील बंद अवस्थेतील पथदिवा बदलून त्याजागी नवीन पथदिवा लावण्यास पोलावर चढला असताना अचानक विजेचा धक्का लागून खाली पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत होवून भालचंद्रचा मृत्यू झाला.
यावेळी भालचंद्रला कामोठे येथील एमजीएम हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते परंतु तपासणीनंतर भालचंद्रला डाॅक्टरांनी मृत घोषित केले.भालचंद्रचा मनमिळावू स्वभावामुळे परिसरातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी एमजीएम हाॅस्पिटलमध्ये दाखल झाले.व त्याच्या कुटूंबियांना आर्थिक मदत जोपर्यंत दिली जात नाही तोपर्यंत भालचंद्रचा मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय घेतला.
यावेळी लोकप्रतिनिधी व उपस्थित ग्रामस्थांची आक्रमकता पाहून विजमंडळाकडून चौदा दिवसांच्या पुढील तारखेचा पाच लाखांचा धनादेश देण्यात आला होता.यानुसार मोहोपाडा विजमंडळाचे उपअभियंता किशोर पाटील,माजी सरपंच संदिप मुंढे,माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश म्हात्रे तसेच स्थानिक नागरिक यांनी भालचंद्र हरिभाऊ जाधव यांच्या घरी जाऊन भालचंद्रची पत्नी भाविका जाधव व त्यांचे कुटुंबीय यांना रोख रक्कम पाच लाख आर्थिक मदत म्हणून सुपूर्द केली.याव्यतिरिक्त भालचंद्र यांच्या कुटुंबीयांना विजमंडळ पंधरा दिवसांनंतर एक लाख देणार आहेत.तसेच भालचंद्रच्या मृत्यूमुळे विम्याची रक्कम, वासांबे ग्रामपंचायतीकडून कुटूंबियांना आर्थिक सहकार्य मिळणार असल्याचेही विश्वसनीय वृत्त आहे.







Be First to Comment