जलसंपदा विभागातील पहिल्या श्रेणीच्या पदावर नियुक्ती
सिटी बेल | रायगड | धम्मशील सावंत |
रायगड जिल्ह्यातील पेण येथील प्रतिक अरविंद वाघमारे याने आपल्या जिद्ध, महत्त्वाकांक्षा व इच्छाशक्तीच्या बळावर एमपीएससी ची महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा वर्ग अ ची परीक्षा उत्तीर्ण होऊन महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागातील सहाय्यक अभियंता या पहिल्या श्रेणीच्या पदावर नियुक्ती मिळवली आहे. त्यामुळे त्याच्या या यशाचे सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक केले जात आहे.
या परीक्षेला महाराष्ट्रातील एकूण २१ जण उत्तीर्ण झाले असून प्रतीक वाघमारे हा मागासवर्गीय प्रवर्गातून सहा जिल्ह्यात म्हणजेच कोकण मधून एकमेव विद्यार्थी आहे. त्यामुळे त्याच्या या यशाचे सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक केले जात आहे. प्रतिकचे आई-वडील हे प्राथमिक शिक्षक असून त्याची लहान बहीण देखील नेट ची परीक्षा उत्तीर्ण असून तीदेखील यूपीएससीची तयारी करीत आहे.
आईवडील शिक्षक असल्याने प्रतिकची जडणघडण चांगल्या प्रकारे झाली असून आपल्या आईवडिलांनी आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवत प्रतिकने एमपीएससी परीक्षेत चांगले गुण मिळवीत यशस्वी बाजी मारली आहे. त्याच्या या यशाने त्याचे आईवडील भारावून गेले आहेत. तसेच त्याने शिक्षण घेतलेल्या पेण एज्यूकेशन संस्थेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील शिक्षकांनी त्याचे भरभरून अभिनंदन केले असून तो आमच्या शाळेचा विद्यार्थी असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे असे कौतुकास्पद उद्गार त्यांनी काढले आहेत.
प्रतिक अभियांत्रिकी क्षेत्रात पदवीधर असून तो एमपीएससी ची परीक्षा उत्तीर्ण होणा-या आधी त्याने युपीएससी ची परीक्षादेखील पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झाला होता. परंतू मुलाखतीमध्ये त्याला कमी गुण मिळाल्याने त्याची नियुक्ती होऊ शकली नव्हती परंतु खचून जाईल तो प्रतीक कसला ? त्याने पुन्हा महावितरण ची परीक्षा उत्तीर्ण होऊन महावितरणच्या सेवेत रुजू झाला परंतू त्याची सरकारी सेवेत उच्च पदावर काम करण्याची जिद्द मात्र कायम होती. त्याने एमपीएससी चा अभ्यास सुरूच ठेवला आणि पहिल्याच प्रयत्नात त्याने एमपीएससी ची महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा वर्ग अ ची परीक्षा उत्तीर्ण होऊन महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागातील सहाय्यक अभियंता या पहिल्या श्रेणीच्या पदावर नियुक्ती प्राप्त करण्याचा बहुमान पटकावला.
प्रतिक हा केवळ अभ्यासातच नव्हे तर क्रीडा, साहित्य, संगीत क्षेत्रातही तरबेज आहे. प्रतीक ला तबला वाजवण्याची आवड असून त्याला गायनाची देखील मोठी आवड आहे. त्याने स्वतः तयार केलेल्या चालीवर गायन करून त्याने त्याचा स्वतःचा ‘सावर रे..’ नावाचा म्युजिक अल्बमही बनवला आहे. त्याचा हा अल्बम त्याच्या युट्युब चॅनलवर देखील पाहायला मिळतो. त्याला या क्षेत्रातही उत्तम कामगिरी बद्दल बक्षीस, प्रमाणपत्र मिळाले आहेत. अशा विविध क्षेत्राची आवड असणारा, अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेला विद्यार्थी प्रतीक अरविंद वाघमारे याचे हे यश स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आणि कौतुकास्पद आहे.







Be First to Comment