तीन पोलिसांसह दोन महिला कोरोना पॉझिटिव्ह
सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) :
कोरोना विषाणूंच्या वाढत्या प्रादुर्भावात आपले कर्तव्य बजावताना राज्यात अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण झालेली आहे. असे असतानाच गेल्या तीन दिवसांत नागोठण्यातील तीन पोलिस कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटूंबातील दोन महिलांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे सद्य स्थितीत उपचार घेणाऱ्या नागोठण्यातील कोरोना रुग्णांचा आकडा पाचवे पोचला आहे.
नागोठणे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले एक व नागोठण्यात राहणाऱ्या परंतु इतर पोलिस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या एक अशा दोन पोलिस कर्मचाऱ्यांसह नागोठणे पोलिस ठाण्यात वाहनचालक म्हणून कार्यरत असलेल्या एक पोलिस कर्मचाऱ्यास कोरोना विषाणूची लागण झाली आहे. याशिवाय या पोलीस कर्मचाऱ्यांपैकी दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटूंबातील दोन महिलांनाही कोरोना विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नागोठणे येथील कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या आज पाचवर पोहचली असून नागोठणे शहरातील आत्तापर्यंतची एकूण कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या नऊ इतकी झाली आहे. यातील आंगर आळीतील दोन व शिवाजी चौक परिसरातील दोन असे चार रुग्ण उपचारानंतर सुखरूप घरी परतले आहेत. यामध्ये काल आणि आज पाॅझिटिव्ह रिपोर्ट प्राप्त झालेल्या दोन महिला ह्या याआधीच कोरोना पाॅझिटिव्ह झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटूंबातील आहेत. दरम्यान या कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांवर रोहा येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरु आहेत.
Be First to Comment