सिटी बेल | माथेरान | मुकुंद रांजाणे |
आपला जीवलग आणि अश्वपाल संघटनेचे आधारवड असलेला,सर्वांशी अदबीने वागणारा गरजवंतांच्या नेहमीच मदतीसाठी धावणारा,दानशूर व्यक्तिमत्त्व असलेला मित्र हेमंत बिरामणे यांचे २२ सप्टेंबर २०२० मध्ये कोरोना मुळे निधन झाले होते. त्यामुळे त्यांच्या आठवणी कायम स्मरणात राहाव्यात त्यांच्या जाण्याची उणीव भासू नये याकामी हेमंत बिरामणे यांच्या नावाचा नाका शहराच्या मध्यवर्ती भागात असावा यासाठी धनगर समाजाचे अध्यक्ष अश्वपालक राकेश कोकळे यांनी अश्वपाल मित्र परिवार यांच्या वतीने ३० सप्टेंबर २०२० रोजी नगरपरिषदेच्या कार्यालयात निवेदन सादर केले होते.
याची दखल घेत आज दि.२२ रोजी महात्मा गांधी मार्गावर स्व.हेमंत सहदेव बिरामणे यांच्या नावाने हेमंत नाक्याचे अनावरण नगराध्यक्षा प्रेरणा प्रसाद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मुख्याधिकारी सुरेखा भणगे ( शिंदे),नगरपालिका गटनेते प्रसाद सावंत, उप नगराध्यक्ष आकाश चौधरी,शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी,माजी नगरसेवक प्रकाश सुतार, प्रदीप घावरे,धनगर समाज अध्यक्ष राकेश कोकळे, श्रमिक हातरीक्षा संघटनेचे सचिव सुनील शिंदे,भाजप अध्यक्ष प्रवीण सकपाळ, माजी अध्यक्ष विलास पाटील,किरण चौधरी,वसंत कदम,गजानन अबनावे,नगरसेवक चंद्रकांत जाधव, करन जानकर यांसह भाजपचे सर्व नगरसेवक, नगरसेविका त्याचप्रमाणे अन्य पक्षाचे सदस्य, नागरीक,हेमंत बिरामणे यांचे नातेवाईक तसेच अश्वपालक मोठया संख्येने उपस्थित होते.
या छोटेखानी कार्यक्रमावर वरूण राजाने सुध्दा अभिषेक घातला होता भर पावसात सुध्दा केवळ हेमंत बिरामणे यांच्या प्रेमाखातर जनसमुदायाने हजेरी लावली होती.प्रथम स्मृतिदिनानिमित्त हेमंत बिरामणे मित्र परिवार आणि झुणझुणवाला शंकरा आय फाउंडेशन नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन एका हॉटेलमध्ये करण्यात आले होते.
डॉ. गिरीश बुधराणी,डॉ. राजेश कापसे, डॉ. सचिन भूमकर, चित्रा आणि टीमने योग्यप्रकारे रुग्णांची तपासणी केली. यावेळी अनेक गरजूंनी या सुवर्ण संधीचा लाभ घेतला. आपल्या मित्राबद्दल अनेकांनी जुन्या आठवणींना उजाळा देत हेमंत बिरामणे यांच्या विषयी असलेल्या भावना व्यक्त केल्या अनेकांना यावेळी आपले अश्रू अनावर झाले होते.महात्मा गांधी मार्गावर हेमंत नाका उभारण्यात आला आहे या भागाचे सुशोभीकरण आणि स्वच्छता राखली गेली पाहिजे याच मुख्य रस्त्यावर घोड्यांना बांधलेले असते त्यामुळे पादचाऱ्यांना पायी चालत जाणे म्हणजे एकप्रकारे तारेवरची कसरत असते ह्या रस्त्याला जे काही घोड्यांच्या तबेल्याचे स्वरूप आले आहे त्यामुळे या भागात मोठया प्रमाणावर घोड्यांच्या मलमूत्राने दुर्गंधीचा सामना पर्यटकांना, नागरिकांना आणि आजूबाजूच्या व्यापारी वर्गाला सहन करावा लागत आहे.
हेमंत बिरामणे यांच्या नावाच्या नाक्याचे अनावरण करण्यात आल्यामुळे निदान यापुढे तरी हा संपूर्ण भाग दुर्गंधी मुक्त आणि स्वच्छ असावा, या ठिकाणापासून रेल्वे स्टेशन पर्यंत नगरपरिषदेच्या माध्यमातून पर्यटकांना विश्रांती साठी बाकडे बसविण्यात आल्यास हा भाग नक्कीच सुशोभित आणि स्वच्छ राहील असे स्थानिक व्यापारी वर्गासह नागरिकांचे म्हणणे आहे.







Be First to Comment