सिटी बेल | उरण | घनःश्याम कडू |
मिळणार्या घरपट्टीतील 5% निधी दिव्यांग निधी म्हणून दिव्यांगांना वाटप करावयाचे असते. मात्र याला बगल देत चाणजे ग्रामपंचायतीने गेले सलग 3 वर्षे दिव्यांग निधी वाटप केलेली नाही. यामुळे दिव्यांग बांधवात नाराजीचा सूर निघत आहे.
याबाबत ग्रामसेवक भास्कर पालकर यांच्याकडे विचारणा केली असता आपण त्यावेळी नव्हतो, मात्र यावर्षी दिव्यांग निधीचे वाटप करू असे सांगितले. मग गेली 3 वर्षे दिव्यांग निधीचे वाटप का केले नाही, हे मात्र गुलदस्त्यातच आहे. याबाबत बेरोजगार अपंग जीवन विकास समाज कल्याण संस्था उरणचे अध्यक्ष योगेश पाटील यांनी उरण पंचायत समिती गटविकास अधिकारी नीलम गाडे यांच्याकडे तक्रार करून दिव्यांग निधी वाटप करण्याची मागणी केली आहे.
दिव्यांग निधीचे वाटप हे ग्रामपंचायतला मिळणार्या घरपट्टीतील एकूण रकमेपैकी 5% निधी दिव्यांग यांना वाटप करण्याचा नियम आहे. चाणजे ग्रुप ग्रामपंचायत या परिसरातील घरपट्टी 70 ते 75 लाख असल्याचे समजते. परंतु ती पूर्णपणे वसूल होत नसल्याचे ग्रामसेवक पालकर यांचे म्हणणे आहे. परंतु ती वसुलीसाठी ग्रामपंचायत ठोस उपाययोजना करताना दिसत नाही.
चाणजे ग्रामपंचायतमधील ग्रामस्थ मनोहर ठाकूर यांनी ग्रामपंचायतमधील भ्रष्ट कारभाराबाबत कारवाईची मागणी केली होती. त्यामध्ये उरण पंचायत समितीमधील अधिकारी वर्गांनी ग्रामपंचायतवर ताशेरे ओढले असून त्याची चौकशी अंतिम टप्प्यात येऊन ही वरिष्ठ अधिकारी याबाबत निर्णय कधी देतात याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. तेव्हा पासून ऐनकेन प्रकारे ग्रामस्थांकडून ग्रामपंचायतीवर तक्रारींचा भडिमार होत आहे. त्यात गेली 3 वर्षांपासून दिव्यांग निधीपासून दिव्यांग बांधवांना वंचीत ठेवण्याचे काम केले आहे.
याबाबत दिव्यांग बांधवांनी अनेकवेळा चाणजे ग्रामपंचायतमध्ये जाऊन दिव्यांग 5% निधीचे वाटप कसे करणार याची विचारणा केली असता सरपंच व ग्रामसेवक यांनी खोटी आश्वासने दिली आहेत. मात्र गेली 3 वर्षे दिव्यांग निधीचे ग्रामपंचायततर्फे वाटप न झाल्याने दिव्यांग बांधव निधीपासून वंचीत राहिले आहेत.
चाणजे ग्रामपंचायतीने गेली 3 वर्षे दिव्यांग निधीचे वाटप का केले नाही याचे स्पष्टीकरण गटविकास अधिकारी नीलम गाडे यांच्याकडे मागितले आहे.
तशाप्रकारचे लेखी पत्र बेरोजगार अपंग जीवन विकास समाज कल्याण संस्था उरण यांनी शुक्रवार दि. 3 सप्टेंबर 2021 रोजी दिले आहे. दिलेल्या पत्रात आम्हांला न्याय मिळाला नाहीतर आम्ही जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद अलिबाग यांच्याकडे तक्रार अर्ज करून दाद मागू असा इशारा संस्थेचे अध्यक्ष योगेश पाटील यांनी दिला आहे.
याबाबत गटविकास अधिकारी नीलम गाडे व ग्रामविस्तार अधिकारी अनिल नारंगीकर यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. ग्रामसेवक भास्कर पालकर यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी मागील दोन वर्षे व यावर्षीची धरून साडेआठ लाख रुपयांचे वाटप येत्या मासिक सभेत करून त्याचे वाटप करण्यात येणार असल्याचे सांगितले. मागील 2 वर्षे दिव्यांग निधीचे वाटप का झाले नाही याचे उत्तर गुलदस्त्यातच आहे. तसेच या ग्रुप ग्रामपंचायतमध्ये घरपट्टीची मोठ्या प्रमाणात असून त्याची वसुली व्यवस्थित होत नसल्याने दिव्यांग यांना दिव्यांग निधी कमी मिळत आहे. तरी ग्रामपंचायतीने घरपट्टी वसुलीसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी दिव्यांग बांधवांनी केली आहे. दिव्यांग व्यक्तीचे अनुदान खर्च न करता बेकायदेशीर ग्रामपंचायत कर्मचारी कामावर काम न करता गेले पाच वर्ष पगार निघत होता, याची चौकशी झाली पाहिजे.







Be First to Comment