सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |
न्यायालयीन खटले सामंजस्याने व सामोपचराने सोडविण्यासाठी उरण न्यायालयात येत्या शनिवार दि. २५ सप्टेंबर रोजी दिवसभर लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी याचा लाभ घेत जास्तीत जास्त न्यायालयीन खटले या लोकन्यायालया मार्फत सोडविण्यात यावे असे आवाहन उरण तालुक्यातील जनतेला उरण न्यायालयातर्फे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.
लोकन्यायालय म्हणजे वाद उदभवला तर शक्यतो तो सामंजस्यपणे सोडवावा ही आपली प्राचीन परंपरा होती. गावातील जुनेजाणती माणसे एकत्र येऊन कुठलाही वाद समजुतीने मिटवित असत. हा वाद ते निःपक्षपातीपणे सोडावीत असत. यालाच गाव पंचायत म्हणत. सध्याचे लोकन्यायालय म्हणजेच गाव पंचायतीचे आधुनिक रूप होय. या लोकन्यायालयात कायदा जाणणारे निःपक्षपाती लोकांचे न्यायमंडळ यांच्यापुढे येणारे प्रकरण समजुतीने न्याय तडजोडी घडवून मिटविले जातात.
सदर लोकन्यालये राज्यातील सर्व न्यायालयात नियमितपणे भरविली जातात.प्रत्येक जिल्ह्याच्या व तालुक्याच्या ठिकाणी दोन महिन्यातून किमान एकदा व आवश्यकता भासल्यास त्याहून अधिक वेळा योग्य त्या सूचना देऊन त्या-त्या न्यायालयामध्ये लोकन्यायालयाचे आयोजन केले जाते.
लोकन्यायालयाचे आयोजन विधी सेवा प्राधिकरणा मार्फत केले जाते. लोकन्यायालय देखील एकअर्थी कोर्टच असते. कोर्टात खटल्याच्या निवाड्यासाठी एकच न्यायाधीश असतो. तर लोकन्यायालयात किमान ३ जाणकार व्यक्तींचे पॅनेल न्यायाधीशांची भूमिका बजावीते. कार्यरत अथवा निवृत्त जेष्ठ न्यायाधीश पॅनेलचे प्रमुख म्हणून तर अनुभवी वकील अथवा कायद्याच्या जाणकार व्यक्ती सदस्य म्हणून लोकन्यायालयाचे काम पहातात.
लोकन्यायालयात दिवाणी, फोजदारी दोन्ही स्वरूपाची प्रकरणे समेटासाठी येऊ शकतात. मोटार अपघात, भूसंपादन भरपाईचे दावे, बँक व अन्य वित्तीय संस्थाचे वसुलीचे दावे, वैवाहिक संबंधातील वाद आदी प्रकरणे सामोचाराने मिटविण्याकडे लोकन्यायालयाचा कल असतो.
उरण न्यायालयात येत्या शनिवार दि. २५ सप्टेंबर रोजी लोकन्यायाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर उरण न्यायाधीश निलेश एम. वाली, सह दिवाणी कनिष्ठ स्तर उरण राहुल बी. पोल, २ रे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर उरण प्रियांका एन. पठाडे आदी लोकन्यालयात न्याय देण्याचे काम पहाणार आहेत. यावेळी ज्या पक्षकारांचा न्यायनिवाडा होईल त्यांना दावा दाखल करताना भरावयास लागलेली रक्कम परत मिळणार आहे. तरी या लोकन्यायालयात जास्तीत जास्त पक्षकारांनी सहभागी होऊन आपले दावे सामोचाराने मिटविण्याचे आवाहन उरण न्यायालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.







Be First to Comment