Press "Enter" to skip to content

मदगड किल्ल्यावर श्री शिवशंभू प्रतिष्ठान आणि स्थानिक दुर्गमित्रांनी राबविली स्वच्छता मोहीम

सिटी बेल| अलिबाग | अमूलकुमार जैन |

श्रीवर्धन तालुक्यातील वांजळे (बोर्ली ) येथील दुर्लक्षित वनदुर्ग मदगड किल्ल्या ची दिवसेंदिवस दुरावस्था झाली असून, हा गड पुरातत्त्व विभागाकडून व स्थानिक प्रशासनाकडून आजतागायत दुर्लक्षितच राहिला आहे. या मदगड किल्ल्यावर नुकतेच श्री शिवशंभू प्रतिष्ठान आणि स्थानिक दुर्गमित्रांनी गवत काढणी व साफ सफाईची श्रमदान मोहीम पार पाडली.

मोहीमे मध्ये मध्ये युवकांकडून गडावर काही ठिकाणी दिशा आणि वास्तु अवशेष फलक उभारण्यात आले. यावेळी श्री शिवशंभू प्रतिष्ठानचे प्रतिक भायदे निखिल पयेर,अंकीत नाक्ती,जयदीप बुधे सागर बिराडी,नितेश पांडव व अन्य १५ युवकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. सकाळी ९ वाजता शिवरायांच्या ध्येय मंत्राचे स्मरण करून युवकानी वाड्या च्या अवशेषांजवळील गवत अन्य साफ- सफाई  केली.

मदगड संवर्धन मोहिमेच्या माध्यमातून महिन्यातील एक दिवस श्रमदान मोहीम प्रतिष्ठानच्या माध्यमातून घेण्यात येणार आसल्याचे यावेळी भायदे यांनी सांगितले.यावेळी गडाबद्दल असलेल्या काही ऐतिहासिक नोंदी आणि त्यांबद्दल माहिती व मार्गदर्शन करण्याचे काम प्रतिष्ठानचे प्रतिनिधी प्रतिक भायदे यांनी केले. त्याच प्रमाणे येत्या आगामी काळात किल्ले मदगडावर असलेल्या टाक्यांचे हाती घेतलेले काम श्री शिवशंभु प्रतिष्ठान अंतर्गत लवकरच पूर्ण होईल जेणेकरून गडावर असलेला एकमेव पाण्याचा स्रोत जतन करून दुर्गप्रेमी आणि वन्य प्राण्यांसाठी मुबलक पाणी उपलब्ध होईल.असे मत श्री शिवशंभू प्रतिष्ठान चे प्रमुख महेश चौलकर यांनी व्यक्त केले.
  

मदगड हा किल्ला छत्रपतींच्या अमलाखाली असल्याची शक्यता बोलण्यात येते.संभाजी राजांच्या मृत्यूनंतर गड सिद्दींच्या ताब्यात गेला; पण मराठ्यांनी जून १७३३ मध्ये मदगड परत स्वराज्यात आणला. बोर्ली वांजळे मार्गावर ५ किमी अंतरावर मदगड आहे. सन १७३५ च्या पत्राप्रमाणे मराठे व सिद्दी यांच्यामधील लढाईच्या प्रसंगात मदगडची संरक्षण व्यवस्था पेशव्यांनी वाढवली होती, आता गडावर घनदाट झाडी झुडपे वाढली आहेत. ही सगळी वनौषधी आहेत.झाडाझुडपांमुळे गडा वरील अवशेष दिसून येत नाहीत. पाण्याची टाकी, घरांची जोती व त्यांची चिरे आढळतात.मदगडावरून श्रीवर्धन, दिघी, दिवेआगर, हिम्मतगड हे पाहू शकतो. हा किल्ला १७ व्या शतकात सिद्दीच्या ताब्यात असताना श्रीमंत रमाबाई पेशवे इ. स. १७७२ मध्ये देवदर्शनासाठी आल्या असताना मदगडवरून तोफांची सलामी दिली गेली, तसेच हत्तीवरून नजराणा पाठविला होता, असा संदर्भ आढळतो.
"श्रीवर्धन तालुक्यातील वांजळे येथील ऐतिहासिक वनदुर्ग मदगड किल्ल्याची मोठी दुरवस्था झाली असून, हा गड पुरातत्त्व विभागाकडून आजतागायत दुर्लक्षितच राहिला आहे.या भागातील पर्यटनात वाढ होण्यासाठी मदगड किल्ल्याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे".
हेश चौलकर, गड किल्ले आभ्यासक

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.