वावे तर्फ आसरेत महत्वपूर्ण सभा : शिक्षण, आरोग्य, स्थलांतर व रोजगारावर मार्गदर्शन व उपायांवर चर्चा, आदिवासी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सिटी बेल | पाली/रायगड | धम्मशील सावंत |
सुधागड तालुका हा आदिवासी बहुल तालुका आहे. येथील डोंगर दऱ्या खोऱ्यात रानावनात जंगल माळरान पठारावर मोठ्या प्रमाणावर आदिवासी कातकरी समाज वास्तव्यास आहे. सुधागडात वावे तर्फ आसरेत आदिवासी बांधवांचे मूलभूत व ज्वलंत प्रश्न सोडवण्यासाठी महत्वपूर्ण सभा पार पडली. यावेळी शिक्षण, आरोग्य, स्थलांतर, रोजगार, निवारा, शेती आदी विषयांवर महत्वपूर्ण चर्चा , आवश्यक उपाय यावर मार्गदर्शन व विचारविनिमय करण्यात आले. या सभेला आदिवासी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी आदिवासी समाजबांधवांची एकजूट दिसून आली. यावेळी
आदिवासी नेते रमेश पवार यांनी आपल्या मनोगतात सुधागड सह जिल्ह्यातील अनेक भागातील आदिवासी समाज आजही मूलभूत नागरी सेवा सोयीसुविधापासून वंचित आहेत. रोजगारासाठी जिल्ह्याबाहेर स्थलांतर मोठ्या प्रमाणात होत असल्याने शासनाने स्थलांतर रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्द करण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी पवार यांनी केली.
आदिवासी कातकरी समाजाच्या मालकी हक्काच्या जमिनी मोठे भांडवलदार, विकासक कवडीमोल भावाने दमदाटी करून खरेदी करतात, हे फसवणुकीचे व अन्यायकारक प्रकार रोखण्यासाठी जनआंदोलन उभारण्याची भूमिका पवार यांनी मांडली. तसेच समाजाची प्रगती साधण्यासाठी शिक्षण हे प्रभावी माध्यम आहे. लोकशिक्षणाची चळवळ गतिमान करून व्यसनमुक्ती साठी येत्या काळात प्रभावीपणे काम करणार असल्याची भूमिका पवार यांनी मांडली.
दगडू वाघमारे म्हणाले की आदिवासी समाज शैक्षणिक प्रगती साधत असून गावात एकोपा नांदवा यासाठी सर्व गाव मिळून एकत्रित सण व उत्सव साजरे केले जातात, यामध्ये पारंपरिक उत्सव साजरे करताना संस्कृती जोपासली जाते, कोरोना महामारीत अन्न धान्याचा तुटवडा निर्माण झाला असताना शासनाने अन्न धान्य पुरविण्यासाठी आवश्यक ती भूमिका घेतली. त्यामुळे या संकटाचा धीराने सामना करता आला.

विष्णु वाघमारे यांनी सांगितले की
आदिवासी निसर्गपूजक आहेत.
आदिवासींची हस्तकला, आदिवासी नृत्य, आदिवासी देवदेवता व परंपरा, लग्नकार्य, अलंकार हा ठेवा अनमोल असा आहे. आपली संस्कृती महान असून या पारंपरिक संस्कृतीचे आपण जतन केले पाहीजे असे वाघमारे म्हणाले. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी ठरणारी लस आदिवासी बांधवांनी स्वयंस्फूर्तीने घ्यावी अशी जनजागृती देखील या बैठकीत करण्यात आली. उपस्थितांना रुचकर भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
यावेळी आदिवासी समाज नेते रमेश पवार, विष्णु वाघमारे,दगडू वाघमारे, गणपत वाघमारे, एकनाथ पवार, अशोक आंग्रे, बारकु वाघमारे, किसन वाघमारे, धोंडू बोडेकर, दशरथ वाळेकर, सुरेश पवार, मारुती वाघमारे, भगवान वाघमारे, बाळु वाघमारे, आदी पदाधिकारी व आदिवासी बांधव उपस्थित होते.








Be First to Comment