संपूर्ण रायगड जिल्ह्यातील पहिला प्रोफेसर होण्याचा मान
सिटी बेल | उरण | वैशाली कडू |
महात्मा फुले आर्ट्स सायन्स आणि कॉमर्स कॉलेज पनवेलचे उप प्राचार्य प्रा. डॉ. नरेश मढवी सर यांची मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाच्या प्रोफेसरपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
तसे नियुक्ती पत्र मुंबई विद्यापीठाच्या वतीने डेप्युटी रजिस्ट्रार श्री रवींद्र साळवे यांनी जॉइंट डायरेक्टर, उच्च शिक्षण कोंकण विभाग, रायगड आणि प्राचार्य डॉ गणेश ठाकूर महात्मा फुले आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेज पनवेल यांच्या नावे दिलेली आहे. प्रा. डॉ. नरेश मढवी हे रायगड जिल्ह्यातील प्रोफेसरपदी नियुक्ती होणारे पहिले प्रोफेसर ठरले आहेत. हे रायगड जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
सदर नियुक्ती होण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन आणि विद्यापीठाशी सलग्नित कागद पत्रांचा पाठ पुरावा प्राचार्य डॉ गणेश ठाकूर यांनी योग्य प्रकारे केल्यामुळेच हे शक्य झाले. डॉ गणेश ठाकूर यांनी वेळोवेळी रिसर्च पेपर संदर्भात मार्गदर्शन केलं आणि त्यांच्याकडे रयत शिक्षण संस्थेच्या सचिव पदाचा आणि प्राचार्य पदाचा प्रदीर्घ प्रशासकीय अनुभव असल्यामुळे योग्य प्रकारे विद्यापीठाशी कागदपत्रांचा पाठपुरावा केला गेला. त्यामुळेच ही नियुक्ती मिळण्यामध्ये प्राचार्य गणेश ठाकूर सरांचा मोलाचा वाटा आहे. आज जर प्राचार्य एच. आर. मढवी हयात असते तर त्यांना खुप आनंद झाला असता.
प्रा. डॉ नरेश मढवी सर हे जसखार गावाचे रहिवासी असून त्यांची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. त्यांचे वडील रामदास मढवी हे मिठागरावर मजुरी करून उदरनिर्वाह करीत होते. त्यांनी त्या हलाखीच्या परिस्थितीत हार न पत्करता आपला मोठा मुलगा प्रा. एच. आर. मढवी यांना शिकवले. डॉ. प्रा. नरेश मढवी वयाने लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. परंतु त्यांचे मोठे बंधू प्राचार्य एच. आर. मढवी सर आणि त्यांच्या वहिनी श्रीमती पुष्पलता मढवी यांनी त्यांना फक्त शिक्षण दीले नाही तर आपल्या मुलांप्रमाणेच त्यांना वागणूक दिली.
उच्च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रा. डॉ. नरेश मढवी सर हे सर्वात प्रथम फुंडे महाविद्यालयात अतिशय कमी मानधनावर तासिका तत्त्वावर लेक्चरर म्हणून रुजू झाले. शिकवण्याची आवड असल्यामुळे ते प्रामाणिकपणे आपले काम करीत राहिले. प्राचार्य एच. आर. मढवी यांनी पनवेल कॉलेज येथे कायम स्वरुपी जागा निर्माण झाल्यावर त्यांची नियुक्ती करण्यात आली. अर्थशास्त्र विषयात खुप हुषार असल्यामुळे ते स्वतः ची प्रगती करत गेले, त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर शोध निबंध सादर केले. त्यांचं प्रामाणिकपणे काम करण्याची विद्वत्ता पाहून काही वर्षांनी मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून नियुक्ती केली गेली.
डॉ. एम. एन. शिंदे, इस्लामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पी. एच. डी. पूर्ण केली. सध्या ते मुंबई विद्यापीठाचे पी. एच. डी. चे गाईड असून दोन विद्यार्थी पी. एच. डी. करत आहेत. सध्या ते महात्मा फुले आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेजमध्ये उपप्राचार्य आणि अर्थशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख आहेत. त्यांची दोन्ही मुले बीई इंजिनिअर असून मोठा मुलगा मल्टी नॅशनल कंपनी मध्ये कार्यरत आहे. त्यांच्या पत्नी जयश्री मढवी यांनी नेहमीच साथ दिली. प्रामाणिकपणे गेली ३५ वर्ष सेवा दिल्यामुळेच त्यांना ह्या मिळालेल्या सन्मान बद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.








Be First to Comment