Press "Enter" to skip to content

कोरोनाच्या व पावसाळी आजाराच्या लक्षणांतील समानतेमुळे नागरिक चिंतीत

दुसऱ्या लाटेनंतर नागरिक झाले बिनधास्त

सिटी बेल | आरोग्य प्रतिनिधी |

सध्या कोरोना रुग्णसंख्या कमी होऊ लागली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे, ही निश्चितच दिलासादायक बाब आहे. परंतु बेसावध राहून चालणार नाही. कारण गेल्या काही दिवस होत असलेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांमध्ये सर्दी , पडसे,ताप यासोबतच मलेरिया, डेंग्यू सारखे आजार वाढत आहे. गेल्या दीड वर्षांपासून जनमनावर कोरोना महामारीचा पगडा मोठा असून आता कोणताही आजार झाला तर आपल्याला कोरोना तर नाही ना ? अशी संशयची पाल मनात चुकचुकल्याशिवाय राहत नाही.

पावसाचा जोर वाढल्यामुळे पावसाळ्यातील आजारांनी ग्रस्त रुग्णसंख्या वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. यासाठी नागरिक, डॉक्टर आणि प्रशासनाने एकत्रितपणे या संकटाचा सामना करणे गरजेचे आहे.

याविषयी अधिक माहिती देताना कल्याण येथील सिद्धिविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ.अभय गायकवाड म्हणाले, ” सध्या लांबलेल्या पावसामुळे अतिसार, कावीळ आणि विषमज्वर असे अनेक आजार वाढत आहेत परंतु अनेक नागरिकांना हे आजार म्हणजे कोरोना संसर्गाची लक्षणे वाटतात व त्यामुळे उपचारास विलंब होतो. कोव्हिड १९ मध्ये ताप,थंडी, खोकला. सर्दी, गळ्यामध्ये खवखव, श्वास घेण्यास त्रास, डोकेदुखी, मांसपेशीमध्ये त्रास, थकवा, कमकुवतपणा सारखी लक्षणे दिसतात. तसेच ही लक्षणे वेगवेगळ्या प्रकारे डेंग्यू आणि मलेरिया आजारात सुद्धा दिसू लागतात त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेऊनच वैद्यकीय चाचण्या व उपचार करावेत. टायफॉईड, मलेरिया, कॉलरा, चिकून गुणिया हे साथीचे आजार पावसाळ्यात पसरण्याची भीती असते. त्यामुळे असे आजार आपल्या घरापर्यंत पोहचू नयेत, यासाठी दक्षता घेणे आवश्यक असते तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपाययोजना करुन घ्याव्यात.”

कोरोनाने श्रीमंत-गरीब, लहान थोर असा भेद केलेलाच नाही. त्यामुळे प्रत्येकाच्या जगण्यावर मर्यादा आल्या. मात्र, त्याचसोबत सात ते आठ महिने सलग घरात कोंडून घेतल्याने अनेक नागरिकांच्या शारीरिक आरोग्याचे प्रश्न तर निर्माण झालेच, ऋतु बदलामुळे ताप आला तर तो ताप कोरोनाचा ताप आहे, असा समज करून डॉक्टरांकडे न जाण्याचा मार्ग काही नागरिक अवलंबितात. मात्र असे वागणे चुकीचे आहे. ताप नेमका कोणत्या प्रकारचा आहे, याचे वैद्यकीय निदान योग्यवेळी होणे गरजेचे आहे.

दुसरी लाट ओसरल्यामुळे अनेक मुंबईकर – ठाणेकर निर्धास्तही झाले आहेत. पावसाळी आजार प्रत्येक वर्षी डोके वर काढतात. त्यामुळे योग्यप्रकारची काळजी घेतली, तर या आजारांनाही दूर ठेवता येईल, याकडे संसर्गजन्य आजाराचे तज्ज्ञ डॉ अभय गायकवाड यांनी लक्ष वेधले आहे. मलेरिया व डेंग्यूच्या आजाराने ताप,डोकेदुखी,थंडी वाजणे सारखे समान लक्षणे व्यक्तीला जाणवतात. जर २४ तासांच्या आत उपचार केले गेले नाही तर यामुळे गंभीर आजार होऊ शकतो. मलेरियाग्रस्त मुलांना एनीमिया,रेस्पिरेटरी डिस्ट्रेट किंवा तणाव,मस्तिष्क संबंधीत मलेरिया होण्याची शक्यता आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.