सिटी बेल | माथेरान | प्रतिनिधी |
माथेरान मधील स्थानिक लोक आजही एकविसाव्या शतकात आपला व्यवसाय आणि व्यवहार अत्यंत इमानदारी आणि विश्वासाने करत असल्याने इथे येणारे पर्यटक हे निर्धास्तपणे येत असतात.
आज गणेशोत्सव निमित्ताने येथील शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते उन्मेष सतीश दाभेकर हे शिवसेनेचे संपर्क प्रमुख तथा नगरपरिषदेचे गटनेते, बांधकाम सभापती प्रसाद सावंत यांच्या सोबत येथील विविध भागात प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेल्या गणरायाच्या दर्शनासाठी निघाले असता पेमास्टर उद्यान परिसरात एक काळ्या रंगाचे वॅलेट( पाकीट) निदर्शनास आले असता त्यामध्ये काही रोख रक्कम आणि महत्वाचे कागदपत्र, बँकेचे विविध कार्ड्स होते. त्यावेळी क्षणाचाही विलंब न लावता प्रसाद सावंत यांनी संबंधित पर्यटकास त्या कार्डावरील मोबाईल नंबर द्वारे संपर्क साधण्यास उन्मेष दाभेकर यांना सांगितले.त्यावेळी हे मुंबई येथील पर्यटक अमर सिंग आपले वॅलेट( पाकीट) गहाळ झाल्याबाबत तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात हजर होते.
अमर सिंग यांना सदर बाबतीत सांगितल्यावर त्यांच्या ताब्यात ते सुपूर्द करण्यात आले. महत्वाचे असणारं ते
वॅलेट( पाकीट) सापडलेले पाहून त्यांना खूपच आनंद झाला त्यांनी प्रसाद सावंत आणि उन्मेष दाभेकर यांचे खूप आभार मानले आणि इथल्या स्थानिकांमधील ही आजही अबाधित असलेली इमानदारी पाहून ते भारावून गेले. यावेळी पत्रकार मुकुंद रांजाणे,रोहित साबळे उपस्थित होते.








Be First to Comment