Press "Enter" to skip to content

तिसरी लाट येतेय मात्र कंत्राटी कोरोना योद्धा आरोग्य सेविकांना अचानक डच्चू

आरोग्य सेविकांनी घेतली आमदार महेंद्र थोरवे यांची भेट

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा शिरकाव कर्जत तालुक्यात झाला. कोरोनाला आवर घालण्यासाठी काही आरोग्य सेविकांची कंत्राटी नेमणूक करण्यात आली होती. कोरोनाच्या पहिल्याव दुसऱ्या लाटेत त्यांनी जीवावर उदार होऊन कोरोना योद्धा म्हणून काम करून अनेकांना दिलासा दिला होता. आता तिसरी लाट येण्याची श्यक्यता वर्तविली असताना नियुक्त आरोग्य सेविकेंना मात्र डच्चू देण्यात आल्याने 1 सप्टेंबर पासून लसीकरण कसे करता येईल. असा प्रश्न निर्माण झाला आहे. या आरोग्य सेविकांनी आमदार महेंद्र थोरवे यांची भेट घेऊन यातून मार्ग काढण्याची विनंती केली.

कर्जत उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाच्या काळात काही आरोग्य सेविकांची कंत्राटी स्वरूपात नियुक्ती केली होती. ही नियुक्ती कोरोना असे पर्यंत होती. कोरोना काळात त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता अनेकांना दिलासा देण्याचे काम केले व अजूनही काम करीत आहेत. लसीकरण करणाचे कामही त्या चोख पणे करीत आहेत.

पहिल्या व दुसऱ्या लाटेत काम करताना यापैकी अनेकांना कोरोनाची लागणही झाली होती. तरीही त्यांनी त्यावर मात करून खऱ्या अर्थाने कोरोना योद्धा म्हणून कर्तव्य बजावले होते व अजूनही बजावत आहेत. मात्र केंद्र शासनातर्फे कोविड – 19 इसीआरपी – 2 बजेट अंतर्गत मनुष्यबळाकरीता लागणारा निधी मंजूर करण्यात आलेला नाही. त्यानुसार कोविड उपचार केंद्राकरिता नेमण्यात आलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा 31 ऑगष्ट संपुष्टात आणाव्यात असे पत्र राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्राचे आरोग्य सेवा आयुक्त तथा अभियान संचालक डॉ. रामास्वामी एन. यांनी पाठविल्याने या आरोग्य सेविकांची सेवा संपुष्टात येणार आहे.

तिसऱ्या लाटेची श्यक्यता वर्तविली असताना नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांची सेवा संपुष्टात आणण्यात येत आहे. याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत अविशा पाटील ( अधि परिचारिका ), शामल पाटील ( डाटा एंट्री ऑपरेटर ) सुमित्रा बोलपुरे, भावना अडांगळे ( फार्मासिस्ट ), स्नेहा देशमुख ( लॅब टेक्निशियन ), दीपाली पेमारे, शिल्पा पेमारे, शैला उबाळे, सपना गायकवाड ( आरोग्य सेविका ) यांनी स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडे निवेदन देऊन आपली व्यथा मांडली.

त्यावर थोरवे यांनी ‘कोरोनाचा प्रादुर्भाव असताना व तिसऱ्या लाट रोखण्यासाठी आपण सज्ज असताना असा निर्णय घेणे योग्य नाही.याबाबत वरिष्ठ पातळीवर प्रयत्न केला जाईल.’ असा शब्द दिला. यावेळी माजी उपसभापती मनोहर थोरवे, नगरसेवक संकेत भासे, अभिषेक सुर्वे आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.