Press "Enter" to skip to content

महेंद्र घरत यांची नागोठण्याचे माजी सरपंच पै. फरमानशेठ दफेदार यांच्या निवासस्थानी भेट

कार्यकर्त्यांनी अहंकार सोडा, युवकांनी पुढे या व जेष्ठांनी मार्गदर्शन करा : काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांचा कानमंत्र


सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |

काँग्रेस पक्षाचे नेते माणिकराव जगताप व मधुकर ठाकूर यांच्या निधनाने रायगड जिल्ह्यातील काँग्रेस पोरकी झालेली आहे. दोन्ही नेत्यांच्या निधनाने पक्षात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. परंतु रायगड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची ताकद वाढविण्याची आता आपली जबाबदारी असून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रथम कार्यकर्त्यांनी अहंकार सोडून कामाला लागा. तसेच युवकांनी पुढे या व जेष्ठांनी युवकांना मार्गदर्शन करा असा कानमंत्र रायगड जिल्हा काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी नागोठणे येथे दिला.

जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रे हातात घेण्यापूर्वी रायगड जिल्हा काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी आंबेत येथील कब्रस्तानात जाऊन पै. बॅरिस्टर अ.र. अंतुले कबरीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. त्यानंतर जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी कामास सुरवात केली.

आंबेत येथून पनवेल येथे रवाना होत असताना काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी नागोठण्याचे माजी सरपंच, तत्कालीन काँग्रेस नेते पै. फरमानशेठ दफेदार यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना महेंद्र घरत यांनी आपल्या कार्यकर्त्यांना हा कानमंत्र दिला. तत्पूर्वी जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी काँग्रेसचे जेष्ठ नेते बाबासाहेब अधिकारी यांच्या निवास्थानी जाऊन बाबासाहेब अधिकारी यांचे आशीर्वाद घेतले. तसेच रोहा तालुका काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष पै. निजाम सय्यद यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट दिली.

पै. फरमानशेठ दफेदार यांच्या निवासस्थानी जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या समवेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिटणीस नंदाताई म्हात्रे, प्रदेश सरचिटणीस आमिर सय्यद, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, किसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष सूर्यकांत पाटील, युवा नेते विक्रांत घरत, पेण तालुका अध्यक्ष अशोक मोकल, पेण तालुका अल्पसंख्यांक अध्यक्ष हिदायतुल्ला कुवारे, उरण तालुका अध्यक्ष जे. डी. जोशी, कोकण विभाग अध्यक्ष मार्तंड नाखवा, अखलाक शिलोटे, संजय ठाकूर, विवेक म्हात्रे, रोहा पं. स. सदस्य बिलाल कुरेशी, नागोठणे शहर अध्यक्ष अशपाक पानसरे, युवा नेते सद्दाम दफेदार, सरफराज हाफिज, रमीज दफेदार, आदिल पानसरे, फहद गजगे, मोहन भगत, फरीद बेडोरे, मेहराज पानसरे आदींसह काँग्रेस कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, काँग्रेस नेते मुस्ताकभाई अंतुले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे पुनर्घटन केले जाणार असून काँग्रेस पक्षातील उच्चशिक्षित युवकांच्या शिक्षणाचा उपयोग करून पक्ष संघटना मजबूत केली जाणार आहे. शेवटच्या कार्यकर्त्यालाही बळ दिले जाणार आहे. आपल्या देशाची लोकशाही जगात सर्वात शक्तिशाली असुन या लोकशाहीचे पालन काँग्रेस पक्षात सर्वात चांगल्या पद्धतीने केले जाते.

त्यामुळेच पक्षात सर्वजण एकमुखी निर्णय घेत असतात. प्रत्येक कार्यकर्त्याला पक्षात मानाचे स्थान असून तळागाळातील कार्यकर्त्याला सोबत घेऊन पक्ष संघटना मजबूत केली जाणार आहे. आगामी जिल्हापरिषद निवडणुकीत कोणत्या पक्षाशी आघाडी करायची ते पक्षाच्या आदेशाप्रमाणे ठरविले जाईल असे सांगून काँग्रेस पक्षाचा सर्वात मोठा शत्रू भाजपा असल्याचे जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.