Press "Enter" to skip to content

महेश सानप व रेस्क्यू टीमचे धाडसी व साहसी कार्य अभिमानास्पद : खा.सुनिल तटकरे

महापुरात जिव धोक्यात घालून 200 हुन अधिक नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या महेश सानप यांचा खा.सुनिल तटकरे यांच्या हस्ते सत्कार



सिटी बेल | पाली/बेणसे | धम्मशील सावंत |

महेश सानप व रेस्क्यू टीमचे धाडसी व साहसी कार्य उल्लेखनीय व अभिमानास्पद असल्याचे कौतुकोद्गार  खा.सुनिल तटकरे यांनी काढले. स्वतःचा जिव धोक्यात घालून अनेकांना जीवदान देण्याचे महान कार्य केले. महापुरात नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या महेश सानप यांचा खा.सुनिल तटकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

अतिवृष्टी व महापुरात जिवाच्या आकांताने बचावासाठी धडपडणाऱ्या व मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना वाचविण्यासाठी महेश सानप व टीमने देवदूत  बनून काम केले.   महेश सानप यांच्या वाईल्डर वेस्ट अँडव्हेंचर या टीमने महाड येथे दि.२२ जुलै रोजी आलेल्या पुराच्या पाण्यातून २०० जणांचे प्राण वाचवून बचावकार्याची धुरा यशस्वीरित्या सांभाळली.  त्यांच्या धाडसी व साहसी कार्याचे कौतुक खा.सुनिल तटकरे यांनी केले. 

जग प्रसिद्ध असणारी महेश सानप यांची कोलाड येथील वाईल्डरवेस्ट अँडव्हेंचर ही संस्था, जीवाची पर्वा न बाळगता नेहमी मदतकार्यात सहभागी होत असते, निसर्गाचा प्रकोप होऊन  महापूर आला होता. या पुरामुळे संपूर्ण महाड ला पाण्याचा वेढा दिला होता. पाणी शहरात शिरल्याने बाहेर पडण्याचे सर्व मार्ग बंद झाले होते.संपर्क यंत्रणा कोलमड्या व वीज पुरवठा देखील बंद झाला होता. येथील परिस्थिती अधिकच बिघडत गेली होती.घरात अडकलेल्या लोकांना भर पाऊसात वर छतावर बसण्याची वेळ आली होती.मदतीचे सर्व मार्ग बंद झाले होते तर एनडीआर एफ चे पथक मुंबई गोवा महामार्गावर पाणी असल्याने अडकून राहिले होते.

परंतु अशा कठीण परिस्थितीत सुध्दा जीवाची पर्वा न बाळगता कोलाड येथील वाईल्डरवेस्ट अँडव्हेंचरचे मालक श्री महेश सानप व त्यांची टीम यांनी पुराच्या पाण्यात अडकलेल्या २०० पेक्षा जास्त जणांचे प्राण वाचवत बचावकार्याची धुरा यशस्वीरित्या सांभाळल्याबद्दल व प्रतिकुल परिस्थीतीत असामान्य कार्य केल्याबद्दल खा.सुनिल तटकरे यांनी महेश सानप यांचा सत्कार केला. यावेळी आ.अनिकेत तटकरे, राकेश शिंदे उपस्थित होते. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.