Press "Enter" to skip to content

सुधागड च्या विज समस्येविरोधात मनसे चे पाली महावितरण कार्यालयात घंटानाद आंदोलन

पाली महावितरण कडून समस्यांवर तोडगा न निघाल्यास व्यापक स्वरूपाचे जनआंदोलन : सुनिल साठे

सिटी बेल | रायगड | धम्मशील सावंत |

सुधागड तालुक्यातील जनता विजसमस्येने मागील कित्येक वर्षे हैराण झाली आहे. अनियमित वीजपुरवठा वाढीव बिले यामुळे येथील जनतेत असंतोष खदखदत होता. जनतेच्या या ज्वलंत प्रश्नाला मनसेने वाचा फोडली. सुधागड मनसेतर्फे पाली महावितरण कार्यालयात घंटानाद आंदोलन करण्यात आले. तसेच सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.

वारंवार खंडीत होणारी वीज व गणरायाचे आगमन काही दिवसांवर आले आहे तरी देखील तालुक्यातील पथदिवे चालू करण्यात आले नाहीत. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि प्रशासनाला जागे करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले होते. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी आरती देखील केली. 

यावेळी सुधागड  मनसे अध्यक्ष सुनिल साठे म्हणाले की, सुधागड तालुक्यातील जनतेला विजेचा प्रश्न कायम गंभीर स्वरूपात भेडसावत आहे. सणासुदीचे दिवस असो अथवा पाऊस किंवा ऊन वर्षाचे बाराही महिने वारंवार वीजपुरवठा खंडित होतोय. त्यामुळे विद्यार्थी, व्यवसायिक, शेतकरी यांचे मोठे नुकसान होतेय.

विजबिले मात्र वेळच्या वेळी येतात, कधी ही बिले वाढीव स्वरूपाची असतात, येथील कष्टकरी गोरगरीब सर्वसामान्य जनता मोठ्या रकमेची बिले भरणार कशी ? विजपूरवठा सुरळीत होणे गरजेचे आहे, शासनाला अनेकदा निवेदने देऊन काही सुधारणा होत नसेल तर मनसेचे यापुढील जनआंदोलन अधिक व्यापक स्वरूपाचे असेल, असा इशारा साठे यांनी दिलाय.   

यावेळी सुधागड तालुका मनसे अध्यक्ष सुनील साठे, विभाग अध्यक्ष केवल चव्हाण, पाली शहर अध्यक्ष अंकुश चोरघे, परेश वनगले, अजिंक्य पाशीलकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.